चक्रीवादळातील नूकसान भरपाईसाठी पॅकेज देणार : पालकमंत्री भुजबळ

चक्रीवादळातील नूकसान भरपाईसाठी पॅकेज देणार : पालकमंत्री भुजबळ

नाशिक : निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात कुठेही मनुष्यहानी झालेली नाही. परंतू ५६ जनावरे दगावली आहेत. १९० पक्क्या घरांचे अंशत: तर कच्च्या घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. शासनाकडून या निसर्ग चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या जनावरांसाठी व झालेल्या अन्य वित्तीय हानीसाठी लवकरच पॅकेज जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.४) चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, खरीप हंगाम पूर्व तयारी या बाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

भुजबळ म्हणाले, चक्रीवादळामुळे जिल्ह्यात १ हजार ३१७ विद्युत पोल पडले आहेत. हे विद्युत पोल तात्काळ दुरुस्त करणे अथवा नवे पोल बसविण्याचे काम तात्काळ करण्यात यावे. सद्यस्थितीत कुठल्याही गावाचा विद्युत पुरवठा पुर्णत: खंडीत आहे अशी परिस्थिती नाही.

परंतु येणाऱ्या २४ तासात जिल्ह्यातील सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा पुर्ववत होईल याची खबरदारी महावितरणने घ्यावी. आजच्या स्थितीत विद्युत पुरवठा बंद असेल तर लोकांचे दैनंदिन सर्व व्यवहार हे ठप्प होतात. शेतकऱ्यांचा व ग्रामीण भागातला विद्युत पुरवठा शक्यतो खंडीत होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.

शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावे त्यात काही अडचणी असतील तर त्या तातडीने सोडविण्यात याव्यात. जे शेतकरी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र आहेत परंतु निवडणूका व कोविडमुळे त्यांची कर्जमुक्ती थांबली आहे. ते शेतकरी कर्जमुक्त आहेत असे गृहीत धरुन त्यांना पुढील पीक कर्ज देण्यात यावे.

जिल्ह्यातील पीक कर्जाचे उद्दिष्ट्य हे मोठे आहे आणि ते सर्व बँका जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पूर्ण करतील, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. बारदानाअभावी मका खरेदीस अडचणी येत असल्याने व्यवस्थापकीय संचालक पणन विभाग यांच्याशी बैठकीतून संपर्क साधून त्यांनी टेंडर प्रक्रिया लवकर पूर्ण करून बारदान स्थानिक पणन विभागास उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या आहेत.

यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंह, उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी, विभागीय उपायुक्त (महसूल) रघुनाथ गावडे, पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ.एम.आर.पट्टनशेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय विभागाचे नोडल ऑफीसर डॉ.आवेश पल्लोड आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com