रक्तदान मोहिमेसाठी यशस्वीतेसाठी आता फेसबुकचा वापर
स्थानिक बातम्या

रक्तदान मोहिमेसाठी यशस्वीतेसाठी आता फेसबुकचा वापर

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहेत. रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जाणार आहे.

दरम्यान करोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने करोना बरोबरच अन्य आजारांतील गरजू रुग्णांच्या उपचारात रक्ताची गरज असणाऱ्यांना वेळेवर रक्त मिळणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संस्थांच्या रक्तदान शिबिरांसोबतच फेसबूकच्या रक्तदान टूल या सेवेची मदत घेणे सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

राज्यभरातील ७१ शासकीय रक्तपेढ्यांची फेसबुकच्या रक्तदान मोहिमेच्या व्यासपीठावर नोंदणी करणार असून त्यानंतर एखाद्या रक्तपेढीला रक्ताची गरज भासल्यास ती पेढी फेसबुक पेजवर तशी मागणी करेल आणि शहरातील रक्तदात्यांना रक्तदानाबाबत संदेश जाईल, अशी प्रक्रिया असणार आहे.

आवश्यक त्या गटाचे रक्त वेळीच उपलब्ध झाल्यावर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. फेसबुक सारख्या समाज माध्यमाचा वापर रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमासाठी झाल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
– प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास

Deshdoot
www.deshdoot.com