देवळाली कॅम्प : राहुरी येथील दोघे तरुण करोना पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

देवळाली कॅम्प : राहुरी येथील दोघे तरुण करोना पॉझिटिव्ह

Gokul Pawar

देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील भगूर जवळील राहुरी गावात दोघे युवक पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यांना देवळाली कॅन्टोममेन्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

देवळाली-भगूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एकही करोना बाधित रुग्ण नसल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. महिनाभरापूर्वी एक लष्करी अधिकारी व त्यांचा सेवक असे दोघे पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर तद नंतर शेवगे दारणा येथील महिला देखील बाधित झाली होती. हे सर्व पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून कॅन्टोममेन्ट हॉस्पिटलमध्ये नानेगाव, विळोली, लाखलगाव, माडसंगवी या देवळाली मतदार संघातील गावातील संशयित ररुग्ण दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना सोडून देण्यात आले.

(दि.०४) रोजी रात्री राहुरी येथील दोघे जण दाखल करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या वडिलांना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट येणे बाकी असताना त्यांच्या मुलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कॅन्टोममेन्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. राहुरीत राहणारे या परिवाराच्या संपर्कात कोण कोण आले त्यांचा तपास सुरू करून सर्वांची तपासणी केली जाणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com