सिन्नर : भोकणी येथील पाझर तलावात बुडून दोघा भावंडांचा मृत्यू

सिन्नर : भोकणी येथील पाझर तलावात बुडून दोघा भावंडांचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा तलावात बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज (दि. ३०) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

सुप्रिया ज्ञानेश्वर सांगळे (१३) व अनुराग सखाराम सांगळे (११) हे एकमेकांचे चुलत भावंड असून सकाळी कपडे धुण्यासाठी दोघेही घराजवळ असलेल्या पाझर तलावाकडे गेले होते. शिर्डी महामार्गाजवळ भोकण नाल्यावर हा पाझर तलाव आहे. सुप्रिया कपडे धुवत असताना अनुराग पाण्यात उतरला. मात्र, तेथे असलेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

ते पाहून सुप्रियाने आरडाओरड करून जवळच्या शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. हे शेतकरी तिथे पोहोचेपर्यंत तीनेदेखील पाण्यात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने ती देखील पाण्यात बुडाली. मदतीला धावलेल्या शेतकऱ्यांनी दोघांचाही पाण्यात शोध घेतला.

तलावात असलेल्या गाळात दोघेही फसल्याने सुमारे तासाभराने त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर भोकणी येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

भारत तुकाराम सांगळे यांनी या घटनेची माहिती वावी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com