सातपुरला दोन अवैध गॅस भरणा केंद्र उद्धवस्त
स्थानिक बातम्या

सातपुरला दोन अवैध गॅस भरणा केंद्र उद्धवस्त

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । वाहनांमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरुन देणारे सातपुर परिसरातील दोन अड्डे पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने आज छापा मारून उध्वस्त केले. या कारवाईत दोन्ही ठिकाणांवरुन 9 विविध वाहने,गॅस सिलिंडर,मशिनरीसह साडे दहा लाखाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यातील एक अड्डा नगरसेवकाच्या जवळच्या नातेवाईकाचा असल्याची जोरदार चर्चा आहे. गाईच्या गोठ्या आडून हा उद्योग सुरू असल्याचे समोर येत आहे.

निलेश उर्फ भावड्या शेवरे (रा. अशोकनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर गावातील भंदुरे मळ्यात काठेवाडी गोठ्याजवळ शेवरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या प्रवासी वाहनांमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने गॅस भरुन दिला जात होता. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या अवैध धंदे कारवाई पोलीस पथकाने छापा मारला.

या ठिकाणी राहुल केरु पाळदे (रा. बेलतगव्हाण) यास पोलीसांनी ताब्यात घेतले असून मालक निलेश शेवरे फरार झाला आहे. घटनास्थळी गॅस भरण्यासाठी दहा वाहने उभी होती.या वाहनांसह घरगुती बनावटीचे गॅस भरण्याचे तीन इलेक्ट्रिक मशीन,भारत गॅस कंपनीचे 3 सिलिंडर, एच. पी. कंपनीचे एक सिलिंडर, 14 व्यावसायिक सिलिंडर,इलेक्ट्रिक वजनकाटा असा 8 लाख 43 हजार 100 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. शेवरे हा सातपूर परिसरातील एका नगरसेवकाचा जवळचा नातेवाईक असून नगरसेवकांच्या आशिर्वादानेच हा प्रकार गुपचुप सुरू असल्याची चर्चा आहे.

या पथकाने दुसरा छापा एबीबी कंपनीमागील सोमेश्वर कॉलनीत टाकला. ज्ञानेश्वर गोविंद बोंबले (33, रा. शिवाजीनगर सातपूर) यांच्या विटांच्या कच्च्या बांधकाम असलेल्या घरात अवैधरीत्या वाहनांमध्ये घरगुती वापरावयाच्या गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक वाहनांमध्ये गॅस भरतांना रंगे हात पकडण्यात आले.

यात एक रिक्षा आणि मारुती ओमनी असे दोन वाहने, इलेक्ट्रिक मशीन, भारत गॅस कंपनीचे 6 सिलिंडर, रोख दीड हजार रुपये असा 2 लाख 5 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई अवैध धंदे कारवाई पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनेने आणि त्यांच्या पोलीस कर्मचार्‍यांनी केली आहे.

निलेश उर्फ भावड्या शेवरे (रा. अशोकनगर) व ज्ञानेश्वर गोविंद बोंबले (33, रा. शिवाजीनगर सातपूर) यांच्या विरुद्ध दि लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस ऑर्डर मधील तरतुदीनुसार तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com