सिन्नर : जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

jalgaon-digital
2 Min Read

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे येथे जिल्हा नाकाबंदी दरम्यान आज दि १० सकाळी ११ : ३० वाजता संगमनेरहून सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमधून अठरा जनावरांची निर्दयतेने होणारी वाहतूक पोलिसांनी पकडली. या कारवाईत १४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सरहद्दीवर तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे येथील तपासणी नाक्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या सूचनेवरून जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यात येत होता.

पोलीस उपनिरीक्षक अजय ढाकणे, एमआयडीसी व वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच महामार्ग सुरक्षा पथकाच्या कर्मचाऱ्यांना एमएच ०४ जेयु ७०५६ या अशोक लेलँड ट्रक मध्ये म्हैस रेडे व म्हशीच्या पिल्लांची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले.

संबंधित वाहन चालक साकिब अब्दुल गफुर मोमिन (२७) व जुबेर इस्माईल बादशाह शेख (२३) राहणार भिवंडी जि. ठाणे यांच्याकडे जनावरांच्या वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. यानंतर वाहन तपासणी केली असता चार म्हशी, चार रेडे, एक ते दीड वर्ष वयोगटातील म्हशीची अठरा पिल्ले निर्दयपणे ट्रक मधून वाहून नेत असल्याचे उघड झाले.

याप्रकरणी पोलीस शिपाई विठ्ठल पवार यांनी वरील दोघांविरोधात वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना विनापरवाना, बेकायदा जनावरांची निर्दयतेने वाहतूक केल्याप्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *