बँड, बाजा अन बाराती देखील हद्दपार; करोनामुळे रुजतोय शॉर्टकट लग्नाचा ट्रेंड

बँड, बाजा अन बाराती देखील हद्दपार; करोनामुळे रुजतोय शॉर्टकट लग्नाचा ट्रेंड

सिन्नर : लग्न समारंभ म्हटले की आपल्याकडे नसती उठाठेव करावी लागते. पै पाहुण्यांचा मानपान, वधू-वरांचे लाडिक हट्ट पुरवताना यजमानांच्या अक्षरशा नाकीनऊ येतात. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून करोना संसर्गाच्या भीतीने शॉर्टकट लग्नाचा ट्रेंड समाजात रुजू लागला आहे.

बँड, बाजा आणि बाराती लग्न सोहळ्यामधून हद्दपार होताना दिसत आहेत. चंगळवादी संस्कृतीचा अतिरेक म्हणून लग्नसमारंभात होणारी वारेमाप उधळपट्टी यामुळे थांबली असून लग्न कुटुंब प्रमुखांच्या खिशाला बसणारी झळ देखील वाचू लागली आहे.

सामान्यातल्या सामान्य कुटुंबात लग्न करायचे म्हटले तरी ते मंगल कार्यालयातच झाले पाहिजे, लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करताना पंचपक्वान्नाचे जेवण हवे, पाहुण्यांचा मानपान, रुबाबदार फेटे, अमुकच बँड पार्टी हवी, नवरदेवाला मिरवायला घोडा हवा, वऱ्हाडी मंडळींना जाण्यासाठी ट्रक- टेम्पो ऐवजी वातानुकूलित वाहने हवीत आणि हे सर्व छंद पुरवताना वधुवरांच्या आई बापाचे कंबरडे मोडून जाते. केवळ कुटुंबाची बेगडी प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्नकार्यात अकारण पैशांची उधळपट्टी केली जाते.

अर्थात त्यासाठी कर्ज झाले तरी बेहत्तर. यात पुन्हा आपसातील देणे-घेणे असते ते वेगळेच. एवढे करून देखील लग्नकार्यात कुठे काही कमी जाणवली तर आयुष्यभर टोमणे ऐकायची तयारी ठेवावी लागते. मात्र, करोनाच्या संसर्गाच्या भीतीपोटी ही लगीन घाई संपल्यात झाली आहे. शासनाने जमावबंदी आणि संचारबंदी लागू केल्यामुळे साहजिकच लग्नसमारंभातील बडेजाव देखील आटोक्यात आला आहे.

अवघ्या पाच-पंचवीस माणसांच्या उपस्थितीत लग्न सोहळे आटोपले जात असून त्याचा दृश्य फायदा म्हणजे वधू-वर पित्याच्या खिशाला बसणारी झळ बऱ्यापैकी वाचली आहे. चार दोन पाहुण्यांच्या उपस्थित मुला मुलीची संसारगाठ बांधायची आणि वरमाला घातलेल्या नवरानवरीचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून लग्नाचा बार उडवून द्यायचा अशी पद्धत आता रूढ झाली आहे.

कितीही तालेवार कुटुंब असले तरी लग्नाची हौस मिरवण्याचे दिवस करोना ने संपवले आहेत. शॉर्टकट लग्नाचा नवा ट्रेंड यामुळे समाजात रुजत असून विशेषतः वधु पित्या ला करावा लागणारा अकारण खर्च यातून वाचला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com