विनाकारण फिरणाऱ्यांकडून वाहतूक पोलिसांनी केला १५ लाखांचा दंड वसूल
स्थानिक बातम्या

विनाकारण फिरणाऱ्यांकडून वाहतूक पोलिसांनी केला १५ लाखांचा दंड वसूल

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : लॉकडाऊन कालावधीत विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर वाहतुक पोलीसांनी कडक कारवाई केली असून आतापर्यंत १५ लाख ५ हजार दोनशे रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

करोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी २२ मार्चला झालेल्या जनता कर्फ्युनंतर २३ पासून संपुर्ण देशात शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरीकांना संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही मिळेल ती संधी शोधून काहीही कारण सांगूण अनेक युवक तसेच नागरीक दुचाकीवरून संचार करत आहेत.

शहरात करोनाचे पाच रूग्ण पॉझिटिव्ह आढळ्यानंतर पोलीसांनी संचारबंदी अधिक कडक केली असून प्रामुख्याने रूग्ण आढळलेल्या भागात प्रतिबंधीत क्षेत्र करण्यात आले आहे. तसेच संपुर्ण शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये बॅरिकेडींग करण्यात आले आहे.

मात्र शासनाने दिलेल्या अंशत शिथिलतेचा गैरफायदा घेत अनेकांनी संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केले. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी वाहने जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध पोलीस ठाण्यांनी मिळून ३०० पेक्षा अधिक वाहने जप्त केली आहे. पोलीस ठाण्यांच्या पोलीसांबरोबरच वाहतुक शाखेचे कर्मचारी विविध ठिकाणी कार्यरत आहेत.

तसेच गस्ती पथके सतत गस्त घालत असून वाहतुक शाखेच्या कर्मचार्‍यांनी वाहने जप्त करण्यासह अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार २३ मार्चपासून आतापर्यंत हजारो वाहनांवर कारवाई करत त्यांच्यावर १५ लाख ५ हजार दोनशे रूपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी २ लाख ८३ हजार २०० रूपये दंड रोख स्वरूपात वसुल करण्यात आला आहे. तर १२ लाख २२ हजार ६०० रूपयांचे ई चलान फाडण्यात आले आहेत.

त्यानुसार वाहनचालकांना ऑनाईन दंड करण्यात आला असून त्याचे एसएमस त्यांना पाठवण्यात आले आहेत. नागरीकांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस करत आहेत.

दंडाऐवजी जीव वाचवा
लॉकडाऊन, संचाबंदी असताना घराबाहेर पडण्याचे टाळणे आवश्यक आहे. परंतु अनेक नागरीक विनाकारण वाहने घेऊन फिरताना आढळून आली आहेत. अशांवर वाहतुक विभागाने दंडात्मक कारवाई केली. दंड वसुल करणे हा आमचा हेतु नाही. नागरीकांनी दंडाच्या भितीने नाही तर जीव वाचवण्यासाठी घरातच थांबावे.
– मंगलसिंग सुर्यवंशी, सहायक पोलीस अधीक्षक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com