Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवाहतूक कोंडी : स्मार्टरोड होऊनही ‘अशोक स्तंभ’चा गुंता कायम

वाहतूक कोंडी : स्मार्टरोड होऊनही ‘अशोक स्तंभ’चा गुंता कायम

नाशिक । सहा रस्ते एकत्र येत असल्याने स्मार्टरोड होताना सर्वात अडचणीचा ठरलेल्या अशोक स्तंभ चौकात आता स्मार्टरोड पूर्ण झाला आहे. मात्र येथील वाहतूक कोंडीचा गुंता मात्र कायम आहे. स्मार्टरोडच्या कामासाठी गेली दोन ते तीन महिने अशोक स्तंभ चौक बंद होता. 26 जानेवारी रोजी स्मार्टरोडचे उद्घाटन झाले. तेव्हापासून हा चौकही कार्यान्वित झाला. परंतु तत्पूर्वी स्मार्टरोडसह अशोक स्तंभ चौकाने नाशिककरांचा अंत पाहिला.

या चौकातून रविवार कारंजा, गंगापूररोड, रामवाडीमार्गे पंचवटी, वकीलवाडी, सीबीएस असे रोड जातात. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचा वाडा असलेली गोळे कॉलनीतील सर्व रस्ते फिरून अशोक स्तंभाकडे येतात. या ठिकाणी जिल्ह्याला औषधांचा पुरवठा करणार्‍या मेडिकलचे होलसेल वितरकांचे गुदामे व कार्यालये आहेत. यामुळे या भागात सातत्याने गर्दी असते. गंगापूररोडकडे जाणारी वाहने अरूंद अशा घनकरलेन, वकीलवाडी मार्गे स्तंभावर येत असतात. ही वाहने सर्कलवर फिरून सीबीएसकडे जाणारी तसेच रामवाडीकडून येणार्‍या वाहनांना अडथळा करतात. तसेच अनेक वाहने मधूनच गोलाकार वळून वकीलवाडीत रोडने घुसत असतात. याचा मोठा अडथळा प्रामुख्याने बस तसेच मोठ्या वाहनांना होतो.

- Advertisement -

या चौकात रविवार कारंजाकडे जाण्यासाठी चौकाच्या मध्यावरच अनधिकृतपणे रिक्षांचा थांबा करण्यात आला आहे. गंगापूररोडला जाणार्‍या मार्गावर चौकापासून ते गोळी कॉलनीचा रस्ता पुढे पोलीस आयुक्तालय तर विभागीय पशुवैद्यकीय विभागाच्या बाजुने तसेच वकीलवाडीत जाणार्‍या मार्गावर या भागात रिक्षांचा गराडा पडल्याचे चित्र असते. रिक्षा स्टॅण्डची क्षमता 6 ते 8 च्या दरम्यान असताना या ठिकाणी 15 ते 20 रिक्षा उभ्या असतात. अनेकदा रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभ्या असतात. रिक्षा चालकांची मनमानी, प्रवासी मिळवण्यासाठी हुल्लडबाजी या ठिकाणी सुरू असते.

या चौकातील विकसिती करण्यात आलेले वाहतूक बेट काढून टाकण्यात आल्याने चौकाची रूंदी वाढली आहे. मात्र रिक्षा, दुचाकी चालकांच्या बेशिस्तीच्या परिणामी येथील वाहतूक कोंडी थांबण्याचे नाव घेत नाही. या वाहतूक कोंडींचा अनेकदा फटका पोलिसांच्याच वाहनांना बसत असल्याचे वास्तव आहे. या चौक व परिसरात वाहतूक पोलीस अभावानेच केव्हातरी वसुली करताना दिसतात. या चौकातून केटीएचएम महाविद्यालय तसेच इतर महाविद्यालये, विद्यालयांना जाणार्‍या मुलांची संख्या मोठी आहे. तसेच अशोक स्तंभ भागात, गोळे कॉलनीत सर्वाधिक क्लासेस आहेत. या क्लासमध्ये येणारी विद्यार्थी, शिक्षक यांची वाहने बाहेर रस्त्यावरच पार्क केली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असते.

रामवाडी रोडचे काम अपूर्ण
अशोक स्तंभ चौकातून रामवाडी पुलमार्गे पुढे पंचवटी, मखमलाबाद, पेठरोड, दिंडोरीरोड, भाजीमार्केट येथे जाण्यासाठी जवळचा रस्ता आहे. स्मार्टरोडचे काम सुरू केल्यानंतर शेवटी अशोक स्तंभ चौक व पुढे रामवाडीरोडचे काम सुरू करण्यात आले होते. सर्व स्मार्टरोडचे काम पूर्ण झाले असले तरी रामवाडी पूलचा रोड अद्याप अपूर्ण आहे. येथील वाहतूक गेली तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

हवे स्मार्ट नियोजन
स्मार्टरोड व अशोक स्तंभ चौकाचे काम पूर्ण झाल्याने आम्ही सुटकेचा नि:स्वास सोडला आहे. चौकातील वाहतूक बेट काढल्याने चौक अधिक रूंद झाला आहे. मात्र, रविवार कारंजाकडील बाजूस पुढे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अशातच व्यावसायिक गाळ्यांना पार्किंग नसल्याने येथे सर्व वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. याच्या परिणामी वाहतूक कोंडी होते. आता स्मार्ट नियोजनाची आवश्यकता आहे.
– दत्तात्रय निकम, नागरिक
———
रिक्षा चालकांना शिस्तीचा अभाव
अशोक स्तंभ चौकाच्या प्रत्येक कोपर्‍यावर रिक्षांची गर्दी असते. यासह रिक्षाचालक अचानक कुठेही रिक्षा उभी करून बसलेले असतात. चौकातून इतर कोणत्याही वाहनाचा विचार न करता रिक्षा भरधाव पळवल्या जात असल्याने या भागात अपघात होत असतात. अनेकदा रिक्षाचालक रस्त्यावर रिक्षा पार्क धिंगाणा घालत असतात. त्यामुळे इतर वाहनांना अडथळा होतो. हे सर्व थांबायला हवे.
– समाधान जाधव, व्यावसायिक

- Advertisment -

ताज्या बातम्या