सामाजिक भान : किराणा विक्रेत्याचा प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी पुढाकार; पुनर्वापरासाठी खरेदी करणार
स्थानिक बातम्या

सामाजिक भान : किराणा विक्रेत्याचा प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी पुढाकार; पुनर्वापरासाठी खरेदी करणार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : आजही सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक बंदी सुरु असली तरी सर्वसामान्यांच्या दररोजच्या वापरात आणि प्रामुख्याने घरांमध्ये प्लास्टिकचा वापर सुरु असल्याचे दिसून येते. यावर शहरातील किराणा दुकानदारांनी ग्राहकांनी वापरलेल्या प्लास्टिक पिशव्या रिसायकलिंगसाठी संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातल्यानंतर शहरात कागदी पिशव्यांच्या वापरात वाढ झालेली दिसून आली. त्यामुळे प्लास्टिक पिशवीचा वापर करणारे नागरिक, किराणा माल व्यावसायिक, फळभाजी विक्रेते तसेच किरकोळ विक्रेत्यांनी कागदी पिशव्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात सुरू केला. परंतु अद्यापही अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर काही प्रमाणात छुप्या पद्धतीने सुरू आहे. यावर उपाय म्हणून शहरातील किराणा दुकानदार संघटनेने एकत्र येत यावर तोडगा काढला आहे. यासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्लास्टिक पिशव्या रिसायकलिंगसाठी संकलित करणार आहेत. ग्राहकांकडून वापरण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या प्रती प्रतिकिलो १५ रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यानुसार, या प्लॅस्टिकमध्ये प्रकार केले असून छापील लोगो आणि कंपन्यांच्या ब्रँडिंगसह असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या ह्या ५ रुपये प्रतिकिलो दराने विकत घेतल्या जात आहेत. यानंतर एकत्र झालेल्या प्लास्टिक बॅग प्रत्येक महिन्याच्या शेवटी नाशिक महानगरपालिकेला दिल्या जातील. राज्य सरकारने यापूर्वीच प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार नाशिक शहरातील व्यापारी वर्ग या मोहिमेत सहभागी झाले आहे. एकूणच शहरातून प्लास्टिक हद्दपार करणे हा मुख्य उद्देश या मोहिमेचा आहे.

हि मोहीम सुरु करण्यापूर्वी या संघटनेने शहरातील व्यापाऱ्यांना एकत्र करीत या उपक्रमाची माहिती दिली. यामध्ये प्लास्टिक पिशव्या गोळा करण्यापासून ते पुनर्वापरासाठी पाठविण्याची यंत्रणा यावर सखोल चर्चा करण्यात आली. यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकवरील बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी एमपीसीबीने काही निर्देशात्मक तत्त्वे दिली आहेत, त्यानुसार डिस्पोजेबल प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यास परवानगी आहे. प्लास्टिक पिशव्या वापराविरोधात सुरू झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्या पुनर्वापरासाठी खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती न्यू नाशिक ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय कुलकर्णी यांनी दिली.

दरम्यान या चर्चेनंतर वापरात आलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकांकडून खरेदी करण्याचा विचार झाला. जेणेकरुन प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचाही थोडासा हातभार लागेल. यासाठी व्यापारी संघटनेने सर्व छोट्या-मोठ्या दुकान-मालकांशी जनजागृती करण्यासाठी संपर्क साधला आहे आणि त्यांना पुढाकाराने सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.

कचर्‍यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या टाकू नका

नाशिककरांना प्लास्टिकच्या पिशव्या कचर्‍यामध्ये न टाकण्याचे आवाहन केले आहे. वापरलेल्या प्लास्टिक पिशव्या १५ रुपये प्रतिकिलो आणि प्लास्टिकच्या पिशव्या ५ रुपये प्रतिकिलोवर खरेदी करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. सर्व प्लास्टिक पिशव्या रिसायकलिंगसाठी पाठवल्या जातील. नाशिक महानगरपालिकेच्या इंधन प्रकल्पात छापील प्लास्टिक पिशव्या पाठवण्यावरही चर्चा झाली. मुद्रित प्लास्टिक पिशव्यांमधून इंधन निर्मितीची प्रक्रिया महाग असली, तरी व्यापाऱ्यांनी ते कमी दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com