सिन्नर : बसस्थानकावरील सुलभ शौचालय सात वाजताच बंद; प्रवाशांची गैरसोय
स्थानिक बातम्या

सिन्नर : बसस्थानकावरील सुलभ शौचालय सात वाजताच बंद; प्रवाशांची गैरसोय

Gokul Pawar

सिन्नर । सिन्नर बसस्थानकावर असलेले सुलभ शौचालय कुठलीही पूर्वसूचना न देता सायंकाळी 7 वाजताच बंद करण्यात येत असल्याने रात्री येणार्‍या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यात बसमधून येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना याचा जास्त फटका बसत आहे.

बसस्थानकात रात्री 9 पर्यंत दररोज प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे तोपर्यंत हे सुलभ शौचालय सुरू ठेवणे आवश्यक असते. मात्र शनिवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास हे शौचालय बंद असल्याने अनेक प्रवाशांची कुचंंबणा झाली. बसस्थानकात यावेळी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या येतात. बस थांबल्यावर अनेक प्रवासी लघुशंका करण्यासाठी येथे उतरतात. मात्र शौचालय बंद असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला. दुसरी कुठलीही सोय नसल्याने अनेकांना तसेच बसमध्ये बसून पुढचा प्रवास करण्याची वेळ आली.

शौचालय बंद ठेवायचे होते तर ते चालवणार्‍याने तसा फलक लावून माहिती देणे आवश्यक होते. मात्र तशी कुठलीही तसदी न घेता शौचालयाचा चालक थेट सुलभ शौचालयाला कुलूप ठोकून गायब होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सिन्नरच्या आगारप्रमुखांनी प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यासाठी शौचालयाच्या चालकाला सूचना द्यावी व किमान रात्री 9 पर्यंत तरी हे शौचालय प्रवाशांसाठी खुले ठेवावे, अशी मागणी होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com