Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिन्नर : पर्यायी मार्ग बंद झाल्याने अडीच हजार लीटर दूध ओतून देण्याची...

सिन्नर : पर्यायी मार्ग बंद झाल्याने अडीच हजार लीटर दूध ओतून देण्याची नामुश्की

पांगरी : पांगरी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये दुष्काळावर मात करुन येथील बळीराजाने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादनास सुरुवात केली आहे. गावांत जवळपास सात दूध संकलन केंद्रे असून दररोज पंधरा ते सतरा हजार लीटर दुधाचे उत्पादन घेतले जाते. परंतू लाखोंचा पोशिंदा असलेल्या या बळीराजाला करोनामुळे दूध ओतून देण्याची नामुश्की ओढावली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी पांगरी गावात दोन रुग्ण करोना पॉझिटिव्ह सापडले होते. परिणामी प्रशासन आणि आरोग्य विभागाची झालेली धावपळ बघावयास मिळाली होती. सदरील रुग्ण पांगरी खुर्द येथील निर्हाळे रोड परिसरात वस्तीवर रहात असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पांगरी – नि-हाळे रस्ता रुग्णांच्या वस्ती जवळ सील करण्यात आला. पांगरी खुर्द गावच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या सील केलेल्या जागेपासून पुढे नि-हाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या परिसरात राहते.

- Advertisement -

सध्या दुग्धोत्पादन हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय असून या परिसरातून जवळपास अडीच हजार लीटर दुधाचे उत्पादन घेतले जाते. दुधसंकलन केंद्रापर्यंत दूध पोहोचविण्यासाठी पांगरी-नि-हाळे हा एकमेव मार्ग अस्तित्वात होता. परंतू खबरदारी म्हणून तो बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना माघारी जाउन पांगरी – म-हळ शीव रस्ता हा पर्याय होता.

या रस्त्याने दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास करून पांगरी खुर्द येथे पोहोचता येते. परंतू हा शीवा वरील रस्ता म-हळकरांनी काट्या टाकून बंद केल्याने आज मात्र पांगरी खुर्दच्या उत्पादकांना दूध ओतून देण्याची नामुश्की ओढावल्याची माहिती सरपंच सौ.मिनाक्षी शिंदे यांनी दिली.

नाशवंत पदार्थ असलेले दूध संकलन केंद्रापर्यंत पोहोच होउ न शकल्याने उत्पादकांच्या दुःखाला सिमा राहिली नाही. पांगरीत करोना रुग्ण आढळून आल्याने परिसरातील बहुतेक गावांनी आपल्या सिमा बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मार्ग शोधत मार्गक्रमण करावे लागत आहे. नांदुर- म-हळ मार्गे पुणेकर मोठ्या संख्येने येवू लागल्याने म-हळकरांकडून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्याला पर्याय म्हणून नि-हाळे मार्गे पांगरी खुर्द शीव रस्त्याने पांगरीकडे वाहने येवू लागल्याने सदरचा रस्ता बंद करण्यात आल्याचे समजते. परंतू यामुळे स्थानिक पांगरी खुर्द करांना याची मोठी किम्मत मोजावी लागली आहे. दरम्यान सरपंच मीनाक्षी शिंदे या शीव रस्त्यावरील ग्रामस्थांशी विचारविनिमय करुन रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत.

शासनाने पांगरी खुर्द- नि-हाळे रस्ता शीवावर बंद करणे गरजेचे होते. तसेच रुग्णांची वस्ती पांगरी – नि-हाळे रस्त्या पासून पाचशे मीटर आत पर्यंत होती. त्यामुळे या वस्तीकडे जाणारा रस्ता सील करणे आवश्यक होते. असे केले असते तर उर्वरित भागातील लोकांना गावापर्यंत सहज पोहोचता आले असते. विनाकरण बारा ते पंधरा किलोमीटरचा फेरा त्यामुळे वाचला असता. प्रशासनाने या गोष्टींचा विचार करुन मार्ग काढावा.
– दत्तू शिंदे, दूध उत्पादक, पांगरी खुर्द

- Advertisment -

ताज्या बातम्या