नांदगाव : लाही लाही करणाऱ्या उन्हात, पाण्यासाठी हरणांचा जीव धोक्यात
स्थानिक बातम्या

नांदगाव : लाही लाही करणाऱ्या उन्हात, पाण्यासाठी हरणांचा जीव धोक्यात

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव । संजय मोरे
नांदगाव तालुक्यातील हरणांसह वन्यप्रणी मृत्युमुखी पडल्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामागची कारणे अनेक असली तरी हरणे व वन्यप्राण्यांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे. वन्यप्राण्यांना संरक्षित क्षेत्र निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पाण्याच्या शोधार्थ हरण साकोरा येथे खोल, कोरड्या विहिरीत पडल्याची घटना नुकतीच घडली.

जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात उन्हाळ्यात झरे व नदीपात्रातील पाणी ओसरू लागते. हरणे मानवी वस्तीकडे येऊ लागतात. अशावेळी काही हरणे कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील हरणांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. शेतातील विहिरीत हरणांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

आजही पाण्यासाठी हरणांची वणवण थांबलेली नाही. पाणीप्रश्न अजूनही कायम आहे. वनविभागाने हरणांसाठी जंगलात काही ठिकाणी पाणवठे केले, मात्र ते पुरेसे नाहीत. नांदगाव तालुक्यातील वनविभागाअंतर्गत हरणांसाठी पाणवठे बांधल्याचे केवळ कागदोपत्री पूर्तता केल्याचे बोलले जाते, मात्र प्रत्यक्षात किती पाणवठे बांधण्यात आले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अन्न व पाण्याच्या शोधात प्राणी जंगल सोडून मानवी वस्तीत येत असल्याची कारणे आता पुढे येत आहेत. यामागील नेमके कारण वन अधिकार्‍यांना सांगता येत नाही; परंतु या कारणांचा शोध घेऊन त्याचा अभ्यास करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. नांदगाव तालुक्यातील वनविभागाच्या क्षेत्रातील मांडवड, साकोरा, चांदोरा, हिंगणवाडी, जतपुरा या भागात हरणांची मोठी संख्या आहे.

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्यासाठी हरणांची भटकंती सुरू असताना साकोरा येथील कमलेश गायकवाड यांच्या शेतात पाण्याचा शोधार्थ खोल, कोरड्या विहिरीत हरीण पडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करीत होते. या हरणाला विहिरीबाहेर पडता येत नव्हते. जवळच गुरे चारणार्‍या सतीश बोरसे यांना विहिरीत पडलेले हरीण दिसले अन् त्यांनी तत्काळ वन सेवकांना पाचारण केले.

वनरक्षक नाना राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने हरण वाचवण्यात यश आले, मात्र हरणाचे कमरेचे हाड मोडले असून दोन्ही पायांना जखमा झाल्या आहेत. दरम्यान, उन्हाळ्यात हरणांना पाणी उपलब्ध व्हावे, वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार करावेत, अशी मागणी होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com