कौतुकास्पद! शिक्षकाने उभारले मयत विद्यार्थिनीच्या पालकांचे घर…

कौतुकास्पद! शिक्षकाने उभारले मयत विद्यार्थिनीच्या पालकांचे घर…

इगतपुरी : तालुक्यातील पेहरेवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी कु.सविता अमृता खडके या विद्यार्थिनीचे २०१६ रोजी राहत्या घरी रात्री झोपेत सर्पदंशाने निधन झाले होते. या गुणवंत विद्यार्थिनीच्या मृत्युमुळे शाळेतील शिक्षकवर्ग कमालीचा हतबल झाले होते. त्यामुळे येथील शिक्षकांनी पाठपुरावा करीत विद्यार्थिनीच्या पालकांना घर बांधून दिले आहे. शिक्षकांच्या माणुसकीचे सर्व परिसरातून कौतुक होत आहे.

दरम्यान येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी सविता हिचे निधन २०१६ मध्ये झाले होते. यावेळी सविताचे घर अगदी कुडामातीचे असल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे येथील शिक्षकांना गुणवंत मुलगी गेल्याची सल बोचत असल्याने त्यांनी इगतपुरी शिक्षक समितीचे पदाधिकारी व वर्गशिक्षक श्री.हरिश्चंद्र दाभाडे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे सततचा पाठपुरावा करून सदर विद्यार्थिनीच्या पालकांना राजीव गांधी अपघात विमा योजनेचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ऑगस्ट २०१८ मध्ये ७५००० रुपये प्राप्त करून दिले. यावरच न थांबता दाभाडे यांनी स्वखर्च करीत तिच्या पालकांना एक घरकुल बांधून दिले.

दाभाडे येथील मुख्याध्यापक असून आपली हुशार व निष्पाप विद्यार्थीनीचा नाहक जीव गेला असल्याची त्यांना खंत होती. केवळ पक्के घर नसल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली याची रुखरुख त्यांच्या मनाला सतत लागून होती. म्हणून त्यांनी संकल्प करीत तिच्या पालकांना कुडा मातीच्या घरापासून चांगले घर दिले. या कार्यात त्यांच्या मित्रांनीही त्यांना मदत केली.

सतत दोन वर्ष जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय ,सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी चकरा मारून मोठ्या कष्टाने मयत विद्यार्थिनीच्या पालकांना मद्त मिळवून दिली. तसेच सामाजिक बांधिलकीतुन स्वतःही मोठी रक्कम त्यात टाकून विद्यार्थिनीच्या पालकांना घर बांधून दिले. घराच्या रूपाने विद्यार्थिनीच्या आठवणी कायम जाग्या राहतील एवढीच अपेक्षा.
-हरिश्चंद्र दाभाड़े, मुख्याध्यापक 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com