निफाड : मूर्ती प्राणप्रतिष्ठा होताच वानराने सोडला प्राण; जाणून घ्या कारण

निफाड : मूर्ती प्राणप्रतिष्ठा होताच वानराने सोडला प्राण; जाणून घ्या कारण

नाशिक : निफाड तालुक्यातही खडकमाळेगाव येथील मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम ग्रामस्थांनी हाती घेतले, मात्र त्यासाठी जुने मंदिर पाडण्यास सुरुवात करताच गावात 5 ते 6 वानरांचे आगमन झाले. काही वानरे निघून गेली, मात्र एका वानराने गावातच मुक्काम ठोकला. या वानराच्या साथीदारांनी त्यास नेण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र वानर गेले नाही. तब्बल एक वर्ष वानर गावातच राहिले.

दरम्यान, बुधवार (दि.26) रोजी हनुमानाचे नवीन मंदिर पूर्ण होवून कलश पूजा झाली. हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली अन् या वानराने 4 वाजून 50 मिनिटांनी प्राण सोडला. एकीकडे मंदिर झाल्याचा आनंद तर दुसरीकडे हनुमान भक्त वानराचा मृत्यू झाला. परिणामी बुधवारी सायंकाळी महादेव मंदिर प्रांगणात या वानराचा ग्रामस्थांनी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केला.

तालुक्याच्या उत्तर भागातील सरहद्दीवर असलेल्या खडकमाळेगाव येथे हनुमान मंदिर पुरातन असल्याने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. त्यासाठी लोकवर्गणी काढली तर शासकीय निधी देखील मिळविला. त्यामुळे मागील वर्षी गावातील हनुमानाचे हे जुने मंदिर पाडण्यास ग्रामस्थांनी सुरुवात केली. मात्र मंदिर पाडण्याचे काम सुरु होताच गावात 5 ते 6 वानरे दाखल झाली. दोन-चार दिवसांच्या मुक्कामानंतर इतर वानर निघून गेली. मात्र त्यातील एका वानराने गावातच मुक्काम ठोकला.

महिनाभराच्या कालखंडानंतर इतर वानरे परत आली व मुक्कामी थांबलेल्या वानराला नेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही. इकडे मंदिर पाडण्याचे काम पुर्णत्वास येत असतांनाच हे वानर गाव व परिसरात फिरत राहिले. ग्रामस्थांनी नवीन मंदिराचे काम हाती घेतले. वानर मात्र हे बारकाईने पाहत असे. मंदिर बांधकाम पुर्ण होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लोटला.

अखेर बुधवार दि.26 रोजी मंदिरावर कळस चढविण्यात आला अन् मंदिरात हनुमान मुर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. हनुमानाला चांगले मंदिर आणि उत्कृष्ट सावली मिळाली हे बघुन या हनुमान भक्ताने दुपारी 4 वाजून 50 मिनिटांनी आपला प्राण सोडला. वानर बेशुद्ध पडले असेल म्हणून ग्रामस्थांनी लागलीच सदरच्या वानरास निफाड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे सांगितले. परिणामी रात्री या वानराचा महादेव मंदिरासमोरील पटांगणात अंत्यविधी करण्यात आला. तब्बल एक वर्षभर गावात राहिलेल्या या वानराचा अकाली मृत्यू ग्रामस्थांना चटका लावणारा ठरला.

गाव हनुमान भक्ताला मुकले
जुने मंदिर पाडल्यापासून ते नविन मंदिराचे काम होईपर्यंत हे हनुमान भक्त गावातून हलले नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूत वानर गावातच राहिले. मात्र वर्षभरानंतर वानराचा दुदैवी मृत्यू ग्रामस्थांना चटका लावणारा ठरला.
दत्ता रायते, मा. संचालक, ला.कृ.ऊ.बा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com