सिन्नर : यंदा खरिपात ६२८४० हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट

सिन्नर : यंदा खरिपात ६२८४० हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट

सिन्नर : येत्या खरीप हंगामात तालुक्यात ६२८४० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. तालुक्यात प्रमुख पारंपारिक पीक असणाऱ्या बाजरीसाठी २७५३० हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली असेल असा अंदाज आहे. तर ११९६१ हेक्टर क्षेत्रात मका, १३९७० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड होईल असा अंदाज आहे. पूर्व भागात कापूस लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून यंदा १४१० हेक्‍टर क्षेत्रात कापूस लागवड केली जाईल असे कृषी विभागाच्या पेरणी लक्षांक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कृषी विभागाकडून दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगाम निहाय पेरणी लक्षांत निश्चित करण्यात येतो. गेल्या हंगामात लागवडीखाली आलेल्या क्षेत्रावरून हा अंदाज बांधला जातो. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात पर्जन्यमान समाधानकारक असल्याने लागवडीखालील क्षेत्रात निश्चितच वाढ झाली आहे. यंदा देखील मान्सून पूर्ण क्षमतेने बरसणार अशी शक्यता गृहीत धरून तालुक्‍यातील एकूण क्षेत्रापैकी ६२८४० हेक्‍टर क्षेत्र खरिपासाठी वापरात येईल असा अंदाज आहे.

तालुक्यात बाजरी व कडधान्य पिके खरीप हंगामातील प्रमुख पिके मानली जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मका व सोयाबीन कडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. नगदी पीक म्हणून मका व सोयाबीन ची लागवड शेतकऱ्यांकडून प्राधान्याने करण्यात येते. असे असले तरी जनावरांच्या चाऱ्याच्या दृष्टीने बाजरीला प्राधान्य देण्यात येते. यंदा तालुक्यात २७५३० हेक्‍टर क्षेत्र बाजरीच्या लागवडीखाली येईल असा अंदाज आहे. तर मक्याची ११९६१ क्षेत्रात लागवड होईल असे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात भात लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात ९०१ हेक्टरमध्ये भात, तर ४८ हेक्टरवर नागलीचे पीक घेतले जाईल असा अंदाज आहे.

तृणधान्य पिकामध्ये ३४१ क्षेत्र ज्‍वारी तर ३४८ हेक्टर क्षेत्र इतर पिकांसाठी गृहीत धरण्यात आले आहे. म्हणजेच येत्या हंगामात ४१२९९ हेक्टरवर तृण धान्य पिकांची लागवड होईल असे दिसते. कडधान्य पिकांमध्ये तूर (४७१ हेक्टर), मूग (८८८ हेक्टर), उडीद (७९९ हेक्टर), इतर पिके (११४ हेक्टर) याप्रमाणे २२७२ हेक्टरवर पेरणी होईल असा अंदाज आहे.

गळित पिकांमध्ये सोयाबीनचा वरचा क्रमांक (१३९७० हेक्टर) असून त्या खालोखाल ३८१२ हेक्टरवर भुईमूग, ७२ हेक्टरवर सूर्यफूल लागवड होईल. तालुक्याच्या पूर्व भागात मागील आठ ते दहा वर्षांपासून कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. नगदी पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. दिवाळीच्या काळात आश्वासक उत्पन्न कपाशी पासून शेतकऱ्यांना मिळते. यंदाच्या हंगामात १४१० हेक्‍टर क्षेत्रात कपाशीची लागवड होईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com