दिंडोरी : जादूटोण्यावरून वृद्धाचा खून
स्थानिक बातम्या

दिंडोरी : जादूटोण्यावरून वृद्धाचा खून

Gokul Pawar

Gokul Pawar

दिंडोरी । विहिरीसाठी जागा दिली नाही म्हणून आपल्यावर जादूटोणा करतो. त्यामुळे आपली प्रकृती नेहमी बिघडत असल्याचा समज करत युवकाने एका वृद्धाचा कुर्‍हाडीने वार करत खून केल्याची घटना उघडकीस आली. त्र्यंबक आबाजी टोंगारे (७२, रा. तिल्लोळी, ता.दिंडोरी) असे मयत वृद्धाचे नाव आहे.

त्र्यंबक टोंगारे यांनी संशयित आरोपी भास्कर रमेश बुरंगे यांच्याकडे ४ ते ५ वर्षांपूर्वी विहिरीसाठी जागा मागितली होती. मात्र त्यांनी ती दिली नाही. त्यामुळे टोंगारे यांनी आपल्यावर जादूटोणा केल्याने आपली प्रकृती नेहमी बिघडते असा समज केला होता. यापूर्वीही टोंगारे यांच्याशी या कारणाने भांडण केले होते. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्र्यंबक टोंगारे हे त्यांच्या शेतातील बैलजोडी व वखर नाळेगाव रस्त्याकडे घेऊन जात असताना भास्कर बुरंगे याने पाठीमागून येत टोंगारे यांच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार केला. यात टोंगारे गतप्राण झाले.

दिंडोरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. खुनाचा गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला अटक केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com