Tuesday, April 23, 2024
Homeनाशिककोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी मानसिक सक्षमता गरजेची; तज्ञ डॉक्टरांचे मत

कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी मानसिक सक्षमता गरजेची; तज्ञ डॉक्टरांचे मत

नाशिकरोड : कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने चेहेडी शिव येथील 31 वर्षीय तरूणाने शनिवारी केलेल्या आत्महत्येमुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. करोना विषाणूमुळे नागरिकांच्या मनात प्रचंड दहशत वाढली असून निर्माण होणारा ताणतणाव व चिंता दूर करण्यासाठी शहरातील मानसविकार तज्ज्ञांसह प्रख्यात डॉक्टरांनी मौलीक मार्गदर्शन केले आहे.

कोरोनाचा मृत्युदर कमी असला तरी या विषाणूची बाधा झालेल्यांच्या संपर्कात येणार्‍यांना त्याची लागण होत असल्याने संपूर्ण जग या विषाणूच्या दहशतीखाली आले आहे.

- Advertisement -

याशिवाय विविध माध्यमांद्वारे करोना संबंधित बातम्यांचा होणारा भडीमार नागरिकांना नैराश्याकडे घेऊन जात आहे. आपल्यालाही करोनाची लागण तर होणार नाही ना, या भीतीने सर्वसामान्य नागरिक कमालीचे चिंताग्रस्त झाले आहेत. यातूनच चेहेडी शिव येथील प्रतीक कुमावत या 31 वर्षीय तरूणाने आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळेच मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.

सद्यस्थितीला सामोरे जाण्यासाठी शारीरिक प्रतिकारशक्तीसह मानसिक सक्षमता दृढ करण्यासाठी तणावाखाली आलेल्या नागरिकांना सुयोग्य समुपदेशन, वाचन, योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा, घरगुती व जुने खेळ, परस्पर संवाद तसेच सोशल मिडियापासून दूर राहणे आदी उपाय करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. या प्रतिबधात्मक उपायांसह प्रतिकारशक्ती वाढवून मानसिक आरोग्य अबाधित राहण्यासाठी केलेले मार्गदर्शन संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यास धीर देणारे आहे.

करोनाबाधित हे गुन्हेगार नसून रुग्ण आहेत. करोनाचे थैमान, करोनाचा राक्षस, करोनाचा थरार अशा विशेषणांनी दिलेल्या माहितीमुळे नैराश्य व चिंतेचे वातावरण तयार होते. या विषाणूमुळे घडणार्‍या नकारात्मक गोष्टींवरच भर दिला जात आहे.

कोरोनाचा प्रसार, प्रचार रोखण्यासाठी आतापर्यंत ज्या पद्धतीने माहिती समोर येत आहे ती पद्धतच चुकीची वाटते. लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडत नसले तरी अफवांचे बेसुमार पेव फुटल्याने एकंदरीतच दहशत निर्माण झाली आहे. तपासणीसाठी गेलेल्या रुग्णात तसे लक्षणे आढळल्यास ‘ताब्यात घेतले’ असा शब्दप्रयोग केल्याने त्या रुग्णात अपराधीपणाची भावना निर्माण होते. मात्र हे कोणीही लक्षात घेत नाही. करोनामुळे मृत्यू होणार्‍यांपेक्षा बरे होण्याची संख्या अडीच पट आहे, ही बाब ठसठशीतपणे समाजापुढे येणे गरजेचे आहे. तथापि, बिनविषारी साप चावल्यानेही व्यक्ती का दगावतो याचे शास्त्रशुद्ध कारण भीती हेच आहे.
-डॉ. अमोल कुलकर्णी

करोनाची लागण झालेल्यांच्या मृत्युचे प्रमाण आपल्याकडे कमी आहे. अद्याप यावर ठोस उपाय सापडले नसले तरी काही उपचारांनंतर रुग्ण बरे झाल्याच्या घटनाही समोर येताना दिसतात. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. करोनाचा सामना करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम होणे हेच एका शूरवीराचे लक्षण आणि ती काळाची गरजही आहे.
-डॉ.अरुण स्वादी

कोणत्याही आजाराचे मूळ ताणतणाव हेच आहे. त्यामुळे आजारांपासून दूर राहण्यासाठी दररोज हलकासा व्यायाम, योगा, प्राणायाम व ध्यानधारणा करणे गरजेचे आहे. यामुळे मानसिक संतुलन तर राहतेच शिवाय प्रतिकारशक्ती वाढण्यास मदतही होते. याशिवाय दररोज गरम पाणी, लिंबू पाण्याचे सेवन करावे.
-डॉ.जगदीश कागदे

संयम ठेवून परिस्थितीचा सामना करणे गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सदस्य घरीच असल्याने त्याचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. कौटुंबिक जिव्हाळा वाढवताना हातातील मोबाईल दूर ठेवून परस्पद संवाद, घरगुती जुने खेळ, एकत्रित जेवण करणे, आठवणींना उजाळा देणे, वाचन, मनन आदी बाबींचा अंगीकार केल्यास एकटेपणा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल. दिवसभर टीव्हीवरील बातम्या बघण्यापेक्षा नेत्यांचे संदेश व प्रशासनाच्या सूचना ऐकून त्याचे पालन करावे.
-डॉ.प्रशांत भुतडा

- Advertisment -

ताज्या बातम्या