सिन्नर : शेतकऱ्यांवर आली ‘मका विकत घेता का ..?’ विचारण्याची वेळ

सिन्नर : शेतकऱ्यांवर आली ‘मका विकत घेता का ..?’ विचारण्याची वेळ

पंचाळे : जनावरांच्या चार्‍याची नेहमीच भ्रांत असलेल्या सिन्नरच्या पुर्वभागात यंदा मात्र समाधानकारक पावसामुळे सुकाळ आहे.

नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या पावसाने विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होत नसल्याने मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करण्यात आली असली तरी सद्यस्थितीत या चाऱ्याला मागणी नसल्याने ‘मका घेता का…?’ असे विचारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पशुधनाच्या संवर्धनासाठी चारा व पाण्याचा प्रश्न सिन्नरच्या शेतकऱ्यांना नेहमीच भेडसावत आला आहे. मात्र, यंदाची परिस्थिती नेमकी उलटी असून चाऱ्यासाठी म्हणून लागवड केलेल्या मक्याला मागणी नसल्याने शेतकऱ्यांना ग्राहक शोधण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. चारा म्हणून विकलेल्या मक्‍याला अधिकचे पैसे मिळतात ही धारणा शेतकऱ्यांची असून मक्याचे धान्य तयार केल्यास बाजारात मागणी नसल्याने आर्थिक उत्पन्न घटणार आहे.

मक्याची कुट्टी करून मुरघास करण्याकडे पशुपालक शेतकऱ्यांचा कल असतो. म्हणूनच मका घेता का अशी गळ दुग्ध उत्पादकांना घातली जात आहे. परंतु मागणी आणि पुरवठ्याचे गणितच कोलमडल्याने शेतकऱ्यांकडून मका घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. सध्या प्रतिगुंठा हजार ते बाराशे रुपये दराने मक्याचा चारा विकला जातोय.

मात्र, या चाऱ्याला अपेक्षित मागणी घटल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यातच सध्या ऊन वाढू लागल्याने त्याचा काहीसा फटका देखील शेतातील उभ्या मका पिकाला बसू लागला आहे. वाढते तापमान आणि पाण्याचा ताण यामुळे मक्याची कणसे भरण्यात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी पाण्याअभावी मका कोमेजायला सुरुवात झाली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com