ठाकरे मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्राचा दबदबा

नाशिक । विजय गिते
तत्कालीन भाजप-शिवसेना महायुतीने नाशिक जिल्ह्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केला होता. मात्र हा बॅकलॉग महाविकास आघाडीने यावेळी भरून काढत नाशिकबरोबरच उत्तर महाराष्ट्रालाही झुकते माप दिले आहे. महाविकास आघाडीने नाशिक व नगरला प्रत्येकी दोन, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याला प्रत्येकी एक कॅबिनेट मंत्रिपद दिले. नगर जिल्ह्याला तर लॉटरीच लागली असून त्यांच्या झोळीत आणखी एक राज्यमंत्रिपद टाकण्यात आले आहे. यातून उत्तर महाराष्ट्राला सहा कॅबिनेट, एक राज्यमंत्रिपद मिळाले असून धुळेकरांना मात्र एकही मंत्रिपद मिळाले नाही.

ठाकरे सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यामध्ये उत्तर महाराष्ट्राला आणि नाशिक जिल्ह्यालाही भरभरून मिळेल, अशी अपेक्षा होेती. ती खरी ठरली. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नाशिक जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ व शिवसेनेचे दादा भुसे यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. भुसे यांना तर कॅबिनेटपदी बढती मिळाली आहे. गतवेळी रिक्त असलेली मंत्रिमंडळातील नाशिकची जागा यामुळे भरून निघाली आहे.

नगर जिल्ह्याला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे आणि अपक्ष शंकराव गडाख (शिवसेनेच्या कोट्यातून) यांच्या माध्यमातून दोन कॅबिनेट मंत्रिपदे तर एक राज्यमंत्रिपद मिळाले आहे. नंदुरबार जिल्ह्यालाही एक कॅबिनेट मंत्रिपद मिळाले असून काँग्रेसचे के. सी. पाडवी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाली आहे. यातून उत्तर महाराष्ट्राला सहा कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद मिळाले आहे. मात्र धुळे जिल्ह्याची पाटी कोरीच राहिली. धुळे जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघांमधून दोन अपक्ष तर प्रत्येकी एक काँग्रेस व भाजपचा आमदार निवडून आला आहे.

तत्कालीन भाजप-शिवसेना युतीच्या मंत्रिमंडळामध्ये नाशिकला दादा भुसे यांच्या माध्यमातून केवळ एकच राज्यमंत्रिपद मिळाले होते. आता त्यांना बढती मिळाली असून ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत. नगर जिल्ह्यातून राम शिंदे, धुळे जिल्ह्यातून जयकुमार रावल तर जळगाव जिल्ह्यातून गिरीश महाजन हे प्रत्येकी एक-एक कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात सामील होते. जळगाव जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाही सुरुवातीला कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला होता. मात्र काही कारणांमुळे त्यांना हे पद सोडावे लागले होते.

त्यानंतर भाजपत दाखल झालेले नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे-पाटील यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाला होता. गतवेळची तुलना करता युतीच्या कार्यकाळात उत्तर महाराष्ट्रात तीन कॅबिनेट व एक राज्यमंत्री असा समावेश झालेला होता. खडसे व विखे यांचा कार्यकाळ मात्र अल्पसा ठरला होता.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *