Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर : माळेगाव फाट्याजवळ होणार भुयारी मार्ग

सिन्नर : माळेगाव फाट्याजवळ होणार भुयारी मार्ग

सिन्नर । नाशिक-पुणे महामार्गावर नेहमीच होणार्‍या अपघातांना आळा बसावा व वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी माळेगाव शिवारातील नाशिक-पुणे महामार्गाच्या क्रॉसिंगवर भुयारी मार्ग होण्यासाठी खा. हेमंत गोडसे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून या भुयारी मार्गासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने 29 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

माळेगाव शिवारात नाशिक-पुणे महामार्गावर क्रॉसिंग पॉईंट आहे. या क्रॉसिंग पॉईंटवरून एक रस्ता सिन्नर शहरासह शिर्डी-कोपरगावकडे तर दुसरा रस्ता संगमनेर, पुण्याकडे जातो. या क्रॉसिंग पॉईंटवर भुयारी मार्ग नसल्याने या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी होते, तर रात्रीच्या वेळी अनेकदा अपघातही होतात. यामुळेच या क्रॉसिंग पॉईंटची अपघाती वळण म्हणून नोंद झालेली आहे.

- Advertisement -

याविषयीच्या अनेक तक्रारी खा. गोडसे यांच्यासह माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे आल्या होत्या. वाजे यांनीही गोडसे यांच्याकडे त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या अपघाती वळणावर भुयारी मार्ग व्हावा यासाठी खा.गोडसे यांचे प्रयत्न सुरू होते. यासाठी खा. गोडसे यांनी अनेकदा केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन भुयारी मार्ग होणे का गरजेचे आहे त्याचे महत्त्व त्यांना पटवून दिले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत गडकरी यांनी या अंडरपासला मंजुरी दिली.

नेहमीच अपघातांना निमंत्रण देणार्‍या माळेगाव शिवारातील नाशिक-पुणे महामार्गावरील या अपघाती क्रॉसिंग पॉईंटवर भुयारी मार्ग मंजूर झाल्याने माळेगाव औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसह सिन्नर तालुक्यातील रहिवाशांमध्ये, वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

तीन महिन्यात होणार प्रत्यक्ष कामाला प्रारंभ
केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाकडून या कामासाठी 29 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून येत्या आठ दिवसांत या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचा शब्द गडकरी यांनी दिला आहे. तसे आदेश त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. या प्रक्रियेतून तातडीने ठेकेदार कंपनीची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत या भ्ाुयारी मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झालेला सर्वांनाच बघायला मिळेल. सिन्नरकरांची जुनी मागणी या माध्यमातून पूर्ण होणार असून खा. गोडसे यांनी आठवण ठेवून या कामाला प्राधान्य दिल्याने तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

नाशिक-पुणे महामार्ग सिन्नर शहराच्या बाहेरुन गेल्यानंतर त्यात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. चिंचोली इंजिनिअरिंग कॉलेजसमोर भुयारी मार्ग मंजूर करून आणण्यासह या महामार्गावरील अनेक कामे यापूर्वीच मंजूर करून आणली होती. माळेगाव फाट्याजवळ एकाच ठिकाणी चार रस्ते असून हे रस्ते ओलांडताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागते. त्यातून अनेकदा छोटे-मोठे अपघात होत असल्याचे मी स्वत: पाहिले आहे. या भुयारी मार्गामुळे सिन्नरकरांचा प्रवास सुखकर होण्यास हातभार लागणार आहे. हीच माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.
-हेमंत गोडसे, खासदार

- Advertisment -

ताज्या बातम्या