स्पर्धा परीक्षेसाठी दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे नाशिकरोडला स्वागत

स्पर्धा परीक्षेसाठी दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे नाशिकरोडला स्वागत

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकातून एरवी परप्रांतीयांना घेऊन जाणा-या श्रमिक रेल्वेगाड्या आज नव्हत्या. तर आज प्लॅटफार्म चारवर रात्री साडेसातच्या सुमारास विशेष ट्रेन दिल्लीहून आली. या ट्रेनमध्ये महाराष्ट्राचे भावी प्रशासकीय अधिकारी होते. राजधानी दिल्लीत स्पर्धा परिक्षा तयारीसाठी गेलेले परंतु लॉकडाऊनमुळे तेथेच अडकलेले हे विद्यार्थी आज राज्यात परतले.

नाशिकरोड रेल्वेस्थानकावर नाशिक, नगर व बीड जिल्ह्यातील १२६ विद्यार्थी उतरले. नाशिकच्या देवळा, इगतपुरी, कळवण, मालेगाव, सटाणा, निफाड, येवला, सिन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा त्यात समावेश होता.

दिल्लीत युपीएसस्सी सारख्या स्पर्धा परिक्षांसाठी चांगले मार्गदर्शन मिळते, तयारी चांगली होते, सुविधा चांगल्या आहेत, स्पर्धा चांगली म्हणून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून विद्यार्थी तेथे जातात. हे विद्यार्थी लॉकडाऊनमुळे तेथेच अडकले होते. त्यांना घरी परतण्याची ओढ लागली होती.

त्यांच्या पालकांनाही मोठी चिंता वाटत होती. त्यांनी सरकारकडे या विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी केली होती. आज दिल्लीहून त्यांच्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात आली. या ट्रेनमध्ये १४३५ विद्यार्थी होते. त्यात मुंबईचे सुमारे साडेतीनशे, ठाण्याचे १७८, नागपूरचे १२१, गोंदिया १११ अशा विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

नाशिकरोडला महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. कांचन लोकवानी, डॉ. मनिषा चव्हाण, विभावरी शिहोरीकर आदींच्या पथकाने सर्वांचे स्क्रिनिंग करुन क्वारनटाईनचे शिक्के मारले. एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक नितीन मैद, के.पी. सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ बस तयार होत्या.

सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते, पोलिस निरीक्षक सूरज बिजली, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत, डी. पी. झगडे, स्टेशनमास्तर आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, मुख्य तिकीट निरीक्षक विजय धोटे, अमोल सहाने, महापालिकेचे विभागीय अधिकारी महेंद्र पगारे, तहसिलदार अनिल दौंडे, मनोज गांगुर्डे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या सर्वांनी विद्यार्थ्यांना एसटी बसमध्ये बसवून निरोप दिला तेव्हा विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. काहींचे पालक त्यांना घेण्यास आले होते.

आजही पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. स्क्रिनींग व क्वारनटाईनचा शिक्का मारल्यानंतरच या विद्यार्थ्यांना स्थानकाबाहेर सोडण्यात येत होते. नाशिक, नगर, बीड अशा रांगा करुन विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. योग्य नियोजनामुळे कोणताही गोंधळ झाला नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com