केंद्राने परवानगी दिल्यास सलून व्यवसाय सुरू करण्याची राज्य सरकारची तयारी : भुजबळ

केंद्राने परवानगी दिल्यास सलून व्यवसाय सुरू करण्याची राज्य सरकारची तयारी : भुजबळ

नाशिक : कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. मात्र सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी नसल्यामुळे राज्य सरकारने सलून शॉप सुरु करण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही.

मात्र केंद्राने परवानगी दिल्यास राज्यात सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगीतले. यावेळी आमदार हिरामण खोसकर देखील उपस्थित होते.

राष्ट्रीय नाभिक महासंघ सलग्न महाराष्ट्र नाभिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली. त्यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत सलून व्यवसायिकांच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासन सकारात्मक असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत व्यावसायिकांच्या प्रशाबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी महाराष्ट्र नाभिक महासंघाचे पदाधिकारी नारायण यादव, अशोक सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, नाना वाघ, गणपत सोनवणे, ज्ञानेश्वर बोराडे, रमेश आहेर, संजय गायकवाड, विनोद गरुड, संतोष वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपने बंद आहे. त्यामुळे नाभिक समाज त्रस्त झाला असून कर्जबाजारी होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

या परिस्थितीत नाभिक समाज नैराश्याग्रस्त असून काही व्यावसायिकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून नाभिक समाजाचे सलून व पार्लर सुरु करण्यास परवानगी द्यावी तसेच त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com