नाशिककरांनो! तुमच्या वाहन वेगावर स्पीडगन लेझर कॅमेऱ्याची नजर; वाचा सविस्तर

नाशिककरांनो! तुमच्या वाहन वेगावर स्पीडगन लेझर कॅमेऱ्याची नजर; वाचा सविस्तर

नाशिक । शहर तसेच जिल्हाभरात वेगवान वाहनांवर कारवाईचा धडाका वाहतूक पोलीस तसेच महामार्ग पोलिसांकडून सुरू आहे. परंतु याबाबतची जनजागृतीच न झाल्याने महामार्गांवरील वेगाची मर्यादा किती? या माहितीचा अभाव असल्याने वाहनचालकांमध्ये मोठा संभ्रम आहे.

राज्य तसेच देशातील रस्ते अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने तसेच राज्य शासनाने शहरे तसेच महामार्गावरील वेगवान वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी 25 ऑक्टोबरपासून वेगमर्यादेच्या अधिसूचना जारी केल्या आहेत. तसेच रज्यातील प्रत्येक आयुक्तालय व महामार्ग पोलीस विभागांना स्पीडगन लेझर कॅमेरा उपकरण असलेली प्रत्येकी दोन आधुनिक वाहने वेग मोजण्यासाठी उपलब्ध केली आहेत. या आदेशानुसार शहर पोलीस आयुक्तालयाने 22 नोव्हेंबरपासून अधिसूचना जारी केली आहे. दोन आधुनिक वाहने अचानकपणे कोणत्याही मार्गावर उभी करून मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा वाहतूक पोलीस तपासत आहेत. 22 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीत भरधाव वेगात वाहने चालवणार्‍या 758 वाहनचालकांना 7 लाख 58 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मात्र संबंधित रस्त्यावर वेगमर्यादा किती आहे याची माहितीच स्थानिक वाहनचालकांनाच नसल्याने बाहेरून येणारे अगर इतर वाहनचालकांना असण्याची सुतराम शक्यता नाही. मुळात नाशिक हे धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. तसेच आता वाईन तसेच इतर पर्यटनस्थळांच्या ठिकाणी सुविधा निर्माण झाल्याने शहरात राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच भाविक येतात. नाशिक शहर अगर नाशिकला जोडणार्‍या महामार्गांवर वाहतूक पोलिसांकडून अचानकपणे वाहनांची वेगतपासणी केली जात आहे. स्थानिक वाहनचालकांनाच वेग मर्यादा माहीत नाही त्यामुळे बाहेरील चालकही या जाळ्यात फसत असून त्यांना काहीही कारण नसताना भुर्दंड बसत आहे.

वेगाने वाहन चालवल्याबद्दल करण्यात येणारा दंड 1 ते 2 हजाराच्या दरम्यान आहे. हा दंड भरण्यास वाहनचालक तयारही आहेत, मात्र कोणत्या मार्गावर किती वेगमर्यादा याची माहितीच कोणाला नसल्याने हा दंड का भरायचा? असा संतप्त प्रश्न वाहनचालक उपस्थित करत आहेत. तसेच हा नाहक बसणारा भुर्दंड बंद करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

चालानचा एसएमस आल्यानंतर गोंधळ
अचानक मोजल्या जाणार्‍या वेग मर्यादेचा थांगपत्ता वाहनचालकांना नसल्याने वाहनचालक नेहमीप्रमाणे वाहने चालवत जातात. परंतु वाहनमालकांना आठ ते दहा दिवसांनंतर मोबाईलवर अचानक हजार ते दीड हजार रुपयांचे चालान नावे पडल्याचा एसएमएस धडकल्यानंतर त्यांचा गोंधळ उडत आहे. आपण केव्हा?, कोठे? आणि कशी? वेगमर्यादा मोडली याबाबत डोके फुटोत्सवर विचार करूनही उत्तर मात्र सापडत नाही.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com