येवला प्रकरणानंतर पोषण आहार तपासासाठी खास भरारी पथके
स्थानिक बातम्या

येवला प्रकरणानंतर पोषण आहार तपासासाठी खास भरारी पथके

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । येवला येथील एका प्रतिष्ठित संस्थेच्या शाळेमध्ये रविवारी (दि. 8) विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अपहार होताना ग्रामीण पोलिसांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकासह तांदूळ वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला़.राज्याचे अन्नधान्य पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत तसेच वाढत्या पोषण आहारामध्ये अपहार होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन,आता जिल्हा स्तरावर पोषण आहार तपासासाठी खास भरारी पथके तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले. राज्यातील शासनमान्य असलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली आहे;मात्र या योजनेमध्ये विद्यार्थ्यांऐवजी काही शिक्षक, अधिकारी आणि ठेकेदारच सुदृढ झाले आहे.

रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास येवला शहराजवळील एका प्रतिष्ठित संस्थेच्या शाळेत पोषण आहारातील तांदूळ बाहेर विक्रीस जात असल्याची माहिती जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना मिळाली होती. याबाबत त्यांनी तातडीने ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी शाळेमध्ये धाड टाकून संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, वाहन चालकाला ताब्यात घेतले.

सोमवारी (दि.9) सकाळी याबाबत बनसोड यांनी तत्काळ शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना पोषण आहारातील तांदळाची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.गट शिक्षणाधिकारी, पोषण आहार अधीक्षक येवला पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली.

बनसोड यांचे आदेश
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याची गंभीर दखल बनसोड यांनी घेतली. पोषण आहारातील अपहारासंदर्भात यापूर्वीही अनेक तक्रारी आलेल्या आहेत.या तक्रारींची दखल घेऊन पोषण आहारावर देखरेख ठेवण्यासाठी भरारी पथके तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com