एसटीच्या ताफ्यात लवकरच सोळाशे बसेस येणार

एसटीच्या ताफ्यात लवकरच सोळाशे बसेस येणार

नाशिक । राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नव्याने सोळाशे बसेसची खरेदी केली जाणार आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात चारशे कोटी रुपये निधीची तरतूद केली असून त्यातील दोनशे कोटी रुपये बस खरेदीला दिले जाणार आहेत.

ग्रामीण भागातील जनतेस आरामदायी आणि सुविधादायक प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी एस. टी. महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बसेस बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बसऐवजी अत्याधुनिक सुविधा असलेल्या वाय-फाययुक्त बस ग्रामीण जनतेला प्रवासासाठी उपलब्ध करून देण्याचे अर्थसंकल्पात प्रस्तावित केले आहे. येत्या काळात महामंडळाच्या ताफ्यातील सर्व जुन्या बसेस बदलून त्याऐवजी नवीन बस देण्याचा शासनाचा मानस आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात सुमारे वीस हजार बसेस आहेत.

यातील बहुतांश बसेसचे आयुर्मान संपले आहे किंवा संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या काही वर्षांत नवीन बसची खरेदी न करता जुन्याच बसची पुनर्बांधणी केली जात होती. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयाने नवीन बस खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या वेळापत्रकानुसार ये-जा करण्यासाठी गरजेनुसार मार्ग व्यवस्थापन आणि बसचे व्यवस्थापन करण्याचेही ठरवण्यात आले आहे. दरम्यान, एसटी बसस्थानके अत्याधुनिक करण्यासाठी एसटीला दोनशे कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्याचीही तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मिनी बसही घेणार
ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणापासून जवळपासच्या गावांमध्ये जाण्यासाठी एसटीचाच पर्याय असतो. त्यामुळे या गावांतील नागरिकांना प्रवासाची सक्षम आणि वेगवान सेवा देण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेल्या दर्जेदार मिनी बसची खरेदी करण्याचेही प्रस्तावित आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com