PhotoGallery : जिल्हाभरात ‘जय शिवाजी जय भवानी’चा जयघोष; विविध लक्षवेधी रथयात्रा

PhotoGallery : जिल्हाभरात ‘जय शिवाजी जय भवानी’चा जयघोष; विविध लक्षवेधी रथयात्रा

नाशिक : ‘जय शिवाजी जय भवानी चा जयघोष जिल्हाभरात निनादत असून वातावरण शिवमय झाले आहे. यासाठी ठिकठिकाणी ढोलताशे, लेझीम, रथ याद्वारे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील मनमाड, सुरगाणा, सिन्नर, दिंडोरी तसेच शहरातील विविध भागात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

मनमाड : जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती आज मनमाड शहर परिसरात पारंपरिक पद्धतीने उत्साह साजरी करण्यात आली.मंगळवारी रात्री सकल मराठा समाजा तर्फे मा. फुले चौकातून भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली होती.

जय भवानी,जय शिवाजी चा जयघोष करत ही मशाल मिरवणूक शहरातील विविध मार्गावरून जाऊन शिवाजी चौकात आल्यानंतर तीची सांगता करण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला ,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधव देखील सहभागी झाले होते.

शिव जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट करण्यात आली होती. शहराच्या वतीने नगराध्यक्षा पद्मावती धात्रक यांनी तर पालिकेच्या वतीने मुख्यधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी शिवबाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सर्व पक्षीय नगरसेवक-नगरसेविका, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सिडको : सिडको येथील डॉ शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालय डॉ डी एस आहेर प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती महोत्सव भव्य रॅली आयोजित करून साजरा करण्यात आला.

दौलत नगर येथील शाळेच्या पटांगणावर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सचिव अमोल पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून भव्य रॅलीची सुरुवात करण्यात आली रॅलीमध्ये विविध पोशाख परिधान केलेले ,विविध वेशभूषा धारण केलेले शिवरायांचे मावळे विविध जाती,धर्मातील, पंथातील वेशभूषा असलेले विद्यार्थी तसेच लेझीम पथक, आदिवासी नृत्य करणाऱ्या मुली ची पथके रस्त्यावरून जाताना सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

सुरगाणा : उंबरठाण येथील जिप शाळा
येथील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगा बद्दल शाळेतील मुलांनी व शिक्षकांनी माहिती सांगितली. हर्षदा गावंडे व प्रणाली पवार या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थीनींनी आपल्या भाषनातून सर्वांचे लक्ष वेधले. हर्षदाने शिवाजी महाराज रयतेचे आवडते राजे का बनले या बद्दल भाषण केले तर प्रणाली पवार हिने इंग्रजीतून आत्मविश्वासाने आणि अभ्यासपूर्ण महाराजांवर आधारित भाषण केले.

सर्व शिक्षकांनी शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र तसेच राजमाता जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांना कसे घडवले या बद्दल राजेंद्र गावित यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शिवाजी महाराजांना शेतकऱ्या बद्दल असणारी काळजी तसेच शिवजयंती ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन साजरी केली जावी. या बद्दल सतीश इंगळे यांनी सांगितले. स्रीयांचा सन्मान करणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज. त्यांची युद्ध निती, गनिमी कावा याबद्दलचा प्रसंग योगिता महाले यांनी सांगितला.

सिन्नर : आडवा फाटा येथून शिवजयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विविध शाळांनी सहभाग घेत वेशभूषा करण्यात आल्या होत्या. तसेच अनेक जनजागृती करणारे रथ यावेळी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे अभिवादन

मालेगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी मालेगावसह परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

तसेच मंत्री श्री. भुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मालेगाव व परिसरात आयोजित कार्यक्रमांना भेट दिली. यावेळी लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com