रिक्षांच्या गराड्यात हरवला ‘शालिमार’; अनाधिकृत विक्रेते, फेरीवाल्यांमुळे कोंडीत भर
स्थानिक बातम्या

रिक्षांच्या गराड्यात हरवला ‘शालिमार’; अनाधिकृत विक्रेते, फेरीवाल्यांमुळे कोंडीत भर

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

मुख्य बाजारपेठेपैकी मानल्या जात असलेल्या शालिमार हा चौक सर्वात मोठा चौक आहे. येथील रस्ता सर्वाधिक रूंद असला तरीही रिक्षांचा पाचही बाजुंनी गराडा, अनाधिकृत विक्रेत्यांचे अतिक्रमण यानेच व्यापला असल्याने बस तसेच सर्वसामान्य नाशिककरांना येथील कायमच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

शालिमार हा मेनरोड या बाजार पेठेची दुसरी बाजू असल्याने तो शहरातील मुख्य चौकांमध्ये मोडतो. मेनरोडकडे जाणारा मार्ग, नाशिकरोड, सीबीएस तसेच सीबीएसकडून शिवाजीरोडने नाशिकरोड, एमजीरोड तसेच मेनरोडच्या बाजार पेठेत जाणारा मार्ग अशा सर्व ठिकाणी जाण्यासाठी या चौकातूनच मार्ग आहे. प्रामुख्याने विविध वस्तुंच्या खरेदीसाठी या भागात कायम गर्दी असते.
या चौकातच नाशिक विभागाचे शासकीय संदर्भ सेवा रूग्णालय आहे. या ठिकाणी सातत्याने रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची ऐ जा सुरू असते. परंतु रूग्णालयाच्या दरातच अनैध विक्रेत्यांचा गराडा असल्याने रूग्णवाहिकाही अडकून पडत असल्याचे चित्र आहे.

या चौकातून नाशिकरोड रेल्वे स्टेशन, भगुर, उपनगर, जुने नाशिक, या भागात जाण्यासाठी सुमारे चार ते पाच बसथांबे आहेत. यामुळे या ठिकाणी कायम प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याला लाभ उठवण्यासाठी बस थांब्यांना तसेच पुर्ण चौकालाच रिक्षांचा गराडा पडलेला असतो. येथील रिक्षा चालक पोलीसाच्या नाकावर टिच्चून रस्त्याच्या मधोमध रिक्षा आडव्या उभ्या करून प्रवाशी भरत असतात. यामुळे एसटी बसला तसेच प्रवाशांना उभे राहण्यासही जागा उपलब्ध नसते. शिवाजीरोडकडे केवळ जाण्यासाठी मार्ग आहे.

पंरतु सीबीएसकडून प्रामुख्याने रिक्षा विरोधी बाजुने घुसून बसथांब्याकडे येत असल्याने या ठिकाणी कायम वाहने आडकून पडलेली असतात. नाशिकरोडकडे जाणारे बसथांबे, टिळकपथकडे जाणारा मार्ग, शिवाजीरोडने सिबीएसकडे जाणारा मार्ग, कालिदास नाट्यमंदिरकडून येणारा तसेच जाणारा मार्ग, अशा सर्व बाजुंनी या चौकाला मोठ्या प्रमाणात रिक्षांचा विळखा असतो. तर रिक्षांच्या पुढील बाजुस बाहेरगावी जाणार्‍या काळ्या पिवळ्या वाहनांची गर्दी असते. यातच प्रामुख्याने चहुबाजूंनी किरकोळ विके्रत्यांंचा पडलेला वेढ्याने येथील वाहतूकीचे दररोज तीन तेरा वाजतात. तर येथे कार्यरत पोलीस कर्मचारी हतबलपणे याकडे पाहत असतात.

आंदोलनाचे केंद्र

शहरात आंदोलन म्हटले की सर्वप्रथम शालिमार बंद असा अलिखीत नियम आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य कार्यालयच या चौकात असल्याने शिवसेनेची बहूतांश आंदोलने, आनंदोत्सव या चौकातच साजरे होतात. या प्रत्येकक्षणी शिवसैनिकांची व त्यांच्या वाहनांची रस्त्यावरच गर्दी असल्याने इतरांना जाण्यास मार्ग शिल्लक राहत नाही. तसेच इतर कोणत्याही पक्षांची आंदोलने, बंदची हाक याचा प्रारंभ शालिमार चौकातून होत असल्याने हा चौक आंदोलनाचा प्रमुख केंद्रच आहे. प्रत्येक आंदोलनात शालिमार चौकाची वाहतुक ठप्प असते.

रिक्षांना शिस्त लावा

शालिमार चौकात चारही बाजूने रिक्षांचा गराडा असतो. या रिक्षा अर्ध्यापेक्षा अधिक रोडवर उभ्या असतात. अनाधिकृत किरकोळ विक्रेते यांची गर्दी यामुळे कोंडीत भर पडत आहे. रिक्षांना शिस्त लागावी.

– अर्जुन भाटिया, व्यावसायिक

नियोजनाचा अभाव

शालिमार चौक हा रूंदीने सर्वाधिक आहे. पंरतु बसथांबे कडेपासून बरेच आतमध्ये आहेत. किरकोळ विक्री करणारे, हातगाडे कोठेही प्रामुख्याने गर्दी होईल अशाच ठिकाणी उभे असतात. यामुळे वाहनांना अडचणी निर्माण होऊन वाहतुक कोंडी होते. या चौकातील वाहतुकीचे तसेच विक्रेत्यांचे योग्य नियोजन झाले तर हा चौक मोकळा होईल.

– हर्षल गांगुर्डे, व्यावसायिक

Deshdoot
www.deshdoot.com