सेट परीक्षा पुन्हा लांबणीवर !
स्थानिक बातम्या

सेट परीक्षा पुन्हा लांबणीवर !

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी होणारी महाराष्ट्र स्टेट एलिजीबिलीटी टेस्ट (सेट) दुसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाने महाराष्ट्र स्टेट एलिजीबिलीटी टेस्ट २०२० अर्थात एमएच-एसईटी २०२० परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर टाकली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी होणार ही परीक्षा २८ जून रोजी होणार होती. कोविड १९ विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली ही परीक्षा २८ जूनला आयोजित करण्यात आली होती, मात्र पुन्हा एकवार ती लांबणीवर टाकण्यात आली आहे.

परीक्षेची नवी तारीख राज्यातील करोना महामारीमुळे उद्भवलेली स्थिती सामान्य झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर नवी तारीख जाहीर करण्यात येईल. setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी सातत्याने ताज्या माहितीसाठी लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात जाहीर झालेल्या परिपत्रकात म्हटले आहे की ‘महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतली जाणारी आणि २८ जून २०२० रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा कराेना महामारीमुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. परीक्षेची नवी तारीख परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल’.

सेट परीक्षा प्रक्रिया जानेवारी २०२० रोजी सुरू करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२० पासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकपदी निवड केली जाते.

Deshdoot
www.deshdoot.com