सिन्नर :  अभियंत्याने घरबसल्या बनविले सेन्सरयुक्त हात धुण्याचे यंत्र
स्थानिक बातम्या

सिन्नर : अभियंत्याने घरबसल्या बनविले सेन्सरयुक्त हात धुण्याचे यंत्र

Gokul Pawar

Gokul Pawar

सिन्नर : लॉकडाऊन काळात कंपनी बंद असल्याने घरी बसून असलेले अभियंता अशोक चांगदेव कहांडळ यांनी सेन्सरयुक्त स्वयंचलित हात धुण्याचे यंत्र तयार केले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाय योजना केल्या जात असताना हे स्वयंचलित यंत्र परिणामकारक ठरू शकेल असा दावा कहांडळ यांनी केला आहे.

मेकॅनिकल इंजिनिअर असलेले कहांडळ हे पळसे येथील युनी डेरिटेंड या कारखान्यात नोकरी करतात. लाॅकडाऊन मुळे कामकाज ठप्प झाल्याने ते घरीच बसून होते. मात्र त्यांच्यातील बुद्धी कौशल्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ सतावत होती. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होईल असे हात धुण्याचे स्वयंचलित यंत्र तयार करण्यास सुरुवात केली आणि यशही मिळवले. गोडेतेलाचा प्लास्टिक ड्रम, पाईपचे तुकडे, सेन्सर, वीज मोटर आदी घरातील वस्तू पासून हे यंत्र त्यांनी तयार केले आहे . त्यासाठी केवळ दिड हजार रुपये खर्च आला.

नळाखाली हात धरताच यंत्रातून हात ओले करण्यासाठी पाच सेकंद पाणी पडते. त्यानंतर पाच सेकंद द्रवरूप साबण पडतो. हात धुण्यासाठी पुन्हा पंधरा सेकंद पाणी पडते. हात धुऊन झाल्यावर ते कोरडे होण्यासाठी दोन्ही बाजूला लावलेले ड्रायर वीस सेकंद सुरू राहतात. ही सर्व प्रक्रिया एका मिनिटात पार पडते. अन्य व्यक्तीने मधेच हात घातल्यास प्रक्रियेत कोणताही खंड पडत नाही. यंत्राचा वापर करताना त्यास कोठेही हाताचा स्पर्श होत नाही. त्यामुळे बाधित व्यक्तीकडून वापर झाल्यास दुसऱ्याला बाधा होण्याची शक्यता नसते. दुकाने, हॉटेल, शाळा, बस स्थानक आदी सार्वजनिक ठिकाणांसह घरात, कार्यालयांत याचा वापर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

स्वयंचलित यंत्राची वैशिष्ट्ये

बेसीनच्या नळाच्या जागेवर यंत्र बसवता येते. प्लास्टिक साहित्यापासून यंत्र बनवले असल्याने ते शाॅकप्रुफ आहे.

अल्प वीज वापरावर यंत्र चालते.
एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहजपणे नेता येते. यंत्राचे प्रत्येक भाग सुट्टे करता येतात व पुन्हा पाच मिनिटात जोडणी करता येते. यंत्रात दोन लीटरचा सोप टॅंक लावला आहे.

पंधरा दिवसात उपकरण बाजारात

कहांडळ यांनी तयार केलेल्या आविष्काराची माहिती मिळताच अनेकांकडून मागणी होत आहे. करोना संसर्ग टाळण्यासाठी उपकरण सर्वसामान्यांना कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लॉकडाऊन अनलॉक झाल्याने उपकरणासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव कहांडळ यांनी सुरू केली आहे.

पंधरा दिवसात हे उपकरण बाजारात आणणार असल्याचे सांगत उपकरण विक्रीतून उत्पन्न मिळणार असले तरी सामाजिक हित विचारात घेऊन अनाथालय, वृद्धाश्रम व समाजासाठी झटणाऱ्या संस्थांना उपकरण मोफत देण्याचा प्रयत्न राहील असे कहांडळ यांनी स्पष्ट केले.

Deshdoot
www.deshdoot.com