Thursday, April 25, 2024
Homeनाशिकएससी प्रवर्गातील 2 लाख 15 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ

एससी प्रवर्गातील 2 लाख 15 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ

नाशिक । अजित देसाई
राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील 2 लाख 14,950 विद्यार्थ्यांना सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षासाठी 616.87 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना व राज्य सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापोटी डिसेंबर 2019 अखेर समाजकल्याण विभागाच्या वतीने नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार व धुळे या जिल्ह्यांतील 24,957 विद्यार्थ्यांना 67.86 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यावर थेट वितरित करण्यात आले आहेत. एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने अर्ज भरून घेण्यात आले होते.

- Advertisement -

शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी राज्यातील 4 लाख 76 हजार 117 विद्यार्थ्यांनी शासनाच्या संकेतस्थळावरून हे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 85 टक्के म्हणजेच 4 लाख 2489 अर्ज डिसेंबरअखेरपर्यंत स्वीकृत करण्यात आले होते. त्यापैकी शिक्षण संस्थापातळीवरून 3 लाख 40,324 अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवल्यावर कार्यालयस्तरावर 2 लाख 55 हजार 171 (75 टक्के) अर्जांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी 2 लाख 14,950 विद्यार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे 616.87 कोटी रुपये वितरित करण्यात आले.

याशिवाय विद्यावेतन आणि राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेतूनदेखील 3.57 कोटी रुपयांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यावेतनासाठी मागणी करणार्‍या 4136 पैकी 562 विद्यार्थ्यांना 37 लाख रुपये देण्यात आले, तर राजर्षी शाहू योजनेतील 19,242 पैकी 10,661 विद्यार्थ्यांना 3.20 कोटींच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला.

प्रलंबित अर्जांची संख्या लक्षणीय
राज्यात शिष्यवृत्ती मागणीसाठी दाखल झालेल्या व स्विकृत करण्यात आलेल्या अर्जांनुसार संस्थापातळीवर 52,202 व समाजकल्याण विभागस्तरावर 65,866 अर्ज प्रलंबित आहेत. शासनाने अर्ज दाखल करण्याची मुदत वारंवार वाढवून दिल्याने प्रलंबित अर्जांची संख्या संस्था व शासनस्तरावर मोठी दिसते. मात्र टप्प्याटप्प्याने हे अर्ज निकाली काढून डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत आहे. फ्रीशिपचेदेखील संस्थापातळीवर 5725 आणि शासनस्तरावर 15,213 अर्ज प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक विभागातून 57,624 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपसाठी चालू शैक्षणिक सत्रात अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 48,713 विद्यार्थी लाभास पात्र ठरले. संस्थापातळीवर पात्र ठरलेल्या 40,839 पैकी 28,394 विद्यार्थ्यांना शासनस्तरावरून योजनेचा लाभ देण्यात आला असून 24,957 विद्यार्थ्यांना 67.86 कोटी रुपये वितरित झाले आहेत. जिल्ह्यांचा विचार केल्यास अहमदनगरमधून 16,810 अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी 8578 विद्यार्थ्यांना 24.45 कोटी वितरित करण्यात आले आहेत. धुळ्यातील 3320 पैकी 1415 विद्यार्थ्यांना 3.61 कोटी, जळगावला 8695 पात्र विद्यार्थ्यांपैकी 4988 जणांना 5.68 कोटी, नंदुरबारमधून 1139 पैकी 752 विद्यार्थ्यांना 1.48 कोटी रुपये तर नाशिकच्या 18749 पैकी 9224 विद्यार्थ्यांना 32.63 रुपये शिष्यवृत्ती डिसेंबरअखेर वितरित करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या