स्मार्ट सिटी कंपनीत मनमानी कारभार; अधिकाऱ्याचा आरोप
स्थानिक बातम्या

स्मार्ट सिटी कंपनीत मनमानी कारभार; अधिकाऱ्याचा आरोप

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । शहरात स्मार्ट सिटी कंपनीअंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र, कंपनी प्रशासन करत असलेल्या नियमबाह्य पद्धतीच्या व मनमानी कारभारामुळे पैशांचा अपव्यय सुरू असल्याचा आरोप स्मार्ट सिटी कंपनीचे उपमहाव्यवस्थापक (पर्यावरण, जल, मल) सुनील विभांडीक यांनी केला.

एचआरडी सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कंपनीचा अनागोंदी कारभार व नोकर भरती धोरणावर टीका केली. नाशिक महापालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीत अटी-शर्तींचे उल्लंघन करून भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. कंपनीत मर्जीतील लोकांना ठेवण्याचा डाव मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांचा आहे.

त्यामुळे सध्या कार्यरत कर्मचार्‍यांना नोकरीतून कमी केले जात आहे. अथवा कर्मचार्‍यांना राजीनामा देण्यास भाग पडले जात असल्याचे विभांडीक यांनी सांगितलेे. अकार्यक्षमता लपवण्यासाठी थविल आपल्या पदाचा गैरवापर करून इतर अधिकारी व कर्मचार्‍यांचा बळी देत आहे. त्यांच्या गलथान कारभारामुळेच उपलब्ध निधीपैकी सुमारे साडेतीनशे कोटी बँकेत पडून आहेत. थविल यांच्या कार्यपध्दतीची विभागीय अथवा गुप्तचर विभागामार्फतचौकशी करण्याची मागणी विभांडिक यांनी केली.

रखडलेले कामे मार्गी लावल्याचा राग मनात धरून थविल यांनी आपल्या कार्यमुक्तीचे आदेश काढले आहेत. मात्र, आपण ते आदेश स्वीकारले नसून वैद्यकीय सुटीवर आहेत. आदेशाबाबत लेखी खुलासा केल्याचे सांगत सध्या राबविण्यात येत असलेल्या नोकर भरतीवर विभांंडिक यांनी आक्षेप घेतला. दरम्यान, विभांडिक यांना अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठेपका ठेवत स्मार्ट सिटी प्रकल्पातून कार्यमुक्त करण्यात आल्याची चर्चा आहे.

तसेच शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या कामांमुळे नाशिककर त्रस्त आहेत. वेळेत कामं पूर्ण न करणं, वाहतुकीचा खोळंबा, काम वेळेवर न होऊनही ठेकेदारांना दिली जाणारी वाढीव रक्कम आणि मुदत यामुळे या कामांबाबत नगरसेवक देखील अनेकदा आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्यातच आता थेट स्मार्ट सिटीच्या अधिकांऱ्यांनीच या कामाच्या नियमिततेबाबत प्रश्न उपस्थित केल्यानं या अंतर्गत वादाची चौकशी होणार का हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com