नाथांच्या पादुका नेण्यासाठी हेलिकाॅप्टर नको शिवशाही हवी; जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
स्थानिक बातम्या

नाथांच्या पादुका नेण्यासाठी हेलिकाॅप्टर नको शिवशाही हवी; जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

Gokul Pawar

नाशिक : कुंदन राजपूत
करोना संकटामुळे यंदा शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरपूर वारी होणार नसून ज्ञानेश्वर माऊंलींसह प्रमुख संतांच्या पादुका हेलिकाॅप्टरने अथवा विमानाने पंढरपूरला नेल्या जाईल, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी घेतला आहे. मात्र, संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर पुजार्‍यांनी हेलिकाॅप्टरने पादुका नेण्यास नापसंती दर्शवली आहे. हेलिकाॅप्टर ऐवजी नाथांच्या पादुका नेण्यासाठी ते शिवशाही बसची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करणार आहेत.

आषाढिला चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांचा कुंभमेळा पंढरपुरात भरत असतो. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, सोपान काका, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज यांच्यासह राज्यातील मानाचा पालख्या व त्यासोबत शेकडो मैल चालत आलेल्या वारकर्‍यांच्या दिंडयांनी पंढरपूर गजबजते.

यंदा मात्र करोनामुळे वारी होणार नाही, असे राज्यशासनाने स्पष्ट केले आहे. पण मानाच्या पालख्यांची विठ्ठल भेट यात खंड पडू नये यासाठी संतांच्या पादुका हेलिकाॅप्टरने पंढरपूरला नेत शेकडो वर्षांची परंपरा अबाधित ठेवली जाईल, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पण निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे पुजारी पादुका नेण्यासाठी हेलिकाॅप्टर ऐवजी शिवशाही बस उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करणार आहे. त्र्यंबकला हेलिपॅड नसल्याने वाहनाने पादुका अोझरला न्याव्या लागतील.

पंढरपुरला देखील हेलिपॅड नसल्याने हेलिकाॅप्टरद्वारे पादुका सोलापूर विमानतळावर नेल्या जातील. तेथून वाहनाने पंढरपुरला पादुका नेल्या जातिल. शिवाय हेलिकाॅप्टरमधे पादुकांसोबत फक्त दोन जणांनाच सोबत जाता येईल. हे सर्व बघता हेलिकाॅप्टर ऐवजी शिवशाही बसची मागणी पुजारी जिल्हा प्रशासनाकडे करणार आहेत.

दरवर्षीचा निवृत्तीनाथ महाराज पालखीचा मार्ग
– पौर्णिमा अथवा प्रतिपदेला पंढरपुरला मार्गक्रमण
– नगर, करमाळामार्गे सोलापूरात प्रवेश
– मार्गात दातली, कोरेगाव, करमाळयाला रिंगण सोहळा

– आषाढिच्या पुर्वसंध्येला पंढरपुरात आगमन
– आषाढिला पादुकांना चंद्रभागेचे स्नान घालून विठ्ठल भेट व दर्शन

हेलिकाॅप्टरने पादुकांसोबत दोन जणांनाच जाता येईल. शिवाय पावसाळा असल्याने हवामान खराब असू शकते. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांकडे हेलिकाॅप्टर ऐवजी शिवशाही बसमध्ये नाथांच्या पादुका नेल्या जाव्यात अशी मागणी करणार आहोत. शिवशाहीमधून मंदिराचे मुख्य पुजारी, ट्रस्टचे विश्वस्त यांसह २० जण पंढरपुरला जाऊ शकतील.
– जयंत गोसावी, पुजारी श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर

Deshdoot
www.deshdoot.com