Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर : लॉकडाऊन असताना समृद्धीचे काम सुरूच; कोरोनाबाबत गांभीर्य नाही

सिन्नर : लॉकडाऊन असताना समृद्धीचे काम सुरूच; कोरोनाबाबत गांभीर्य नाही

वावी : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार सर्वत्र लॉक डाऊनची स्थिती असताना मुंबई – नागपुर समृद्धी महामार्गाचे काम मात्र सुरूच आहे.

या कामावर संबंधित ठेकेदार कंपनी व रस्ते विकास महामंडळाकडून कुठल्याही प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत नसल्याने या कामावरील कामगारांमुळे लगतच्या नागरी वस्त्यांमधील लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप वावीच्या सरपंच नंदा गावडे यांनी केला आहे.

- Advertisement -

संबंधितांना वारंवार सूचना करूनही महामार्गाचे हे काम सुरूच असल्याची तक्रार गावडे यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. समृद्धी महामार्गाचे पॅकेज 12 अंतर्गत काम सिन्नर तालुक्यात सुरू आहे.

हे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीने वावी येथे कॅम्प सुरू केला असून त्याठिकाणी शेकडोंच्या संख्येने कामगार वास्तव्याला आहेत. हे कामगार वेळी-अवेळी गावात फिरतात, त्यांच्याकडून तोंडाला मास्क आगर रुमाल बांधणे किंवा तत्सम प्रकारच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. हे सर्व कामगार परप्रांतीय असल्याने व कॅम्पमध्ये कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सुविधा संबंधित कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात न आल्याने या कामगारांच्या बद्दल लोकांमध्ये संशयाचे वातावरण आहे.

संपूर्ण देश करोनाशी लढा देत असताना आणि देशात सर्वत्र सरकारी प्रकल्प, सरकारी कार्यालयांमधील कामकाज, खाजगी अस्थापना बंद असताना प्रशासनाकडून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मात्र परवानगी देण्यात आली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. पंतप्रधानांनी वैयक्तिक लक्ष घालून वावी व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देशातील करोना संसर्ग आटोक्यात येईपर्यंत समृद्धी महामार्गाचे काम थांबण्याच्या सूचना राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाला कराव्यात अशी विंनती सरपंच गावडे यांनी केली आहे.

समृद्धी कामगार गावात येताना स्वतःच्या आरोग्याची कोणतीच काळजी घेत नाहीत. त्यांना ग्रामपंचायत स्तरावरून तसेच ग्रामस्थांकडून वेळोवेळी सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जातो. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा समृद्धी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना देखील याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
– नंदा गावडे, सरपंच

- Advertisment -

ताज्या बातम्या