संत निवृत्तीनाथ वारी ठरली ‘निर्मलवारी’
स्थानिक बातम्या

संत निवृत्तीनाथ वारी ठरली ‘निर्मलवारी’

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या जयंती निमिताने दरवर्षी पौष एकादशीला राज्यभरातून वारकरी दाखल होत असतात. यंदाच्या वर्षी त्रंबकनगरीतील वारी ही स्वच्छतेमुळे खर्‍या अर्थाने निर्मलवारी ठरली. त्रंबकेश्वर येथील यात्रा ही स्वच्छतापूर्ण ठरावी, रस्त्यावर मानवी मैला पडू नये, पावन त्रंबकनगरी यात्रा पश्चात देखील स्वच्छ रहावी, यासाठी वनवासी कल्याणआश्रमाच्या माध्यमातून ‘निर्मलवारी’ या संकल्पनेच्या आधारे स्वच्छतेचा जागर करण्यात आला.

त्रंबकेश्वर येथे उपलब्ध केलेल्या फिरत्या शौचालयांचा वापर आलेल्या वारकर्‍यांनी करावा यासाठी निर्मलवारीच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. जवळपास 20 विविध ठिकाणी निर्मलवारीच्या 400 स्वयंसेवकांच्या माध्यमातून वारकर्‍यांचे स्वच्छता गृह वापरासंबंधी प्रबोधन करण्यात आले. दि.19 ते 21 जानेवारी या काळात हा उपक्रम राबविण्यात आला.

तसेच,यावेळी सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित मुंजे इन्स्टिट्यूटव मविप्र संचालित के.टी.एच.एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत, शिक्षण, शेतकरी आत्महत्या यासारख्या विषयावर सुमारे 500 वारकर्‍यांशी संवाद साधत सर्व्हेक्षण देखील करण्यात आले. निर्मलवारीत करण्यात आलेल्या प्रबोधनामुळे त्रंबकेश्वर नगरीत स्वच्छता दिसून आल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. याकामी जिल्हा प्रशासन, त्रंबकेश्वर येथील नागरिक, वारकरी, त्रंबक नगरपरिषद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

गेल्या काही वर्षात वारीला येणार्‍या बहुतेक दिंड्यांशी ठेवलेला संपर्क, वारी आधी पत्राने, त्याचप्रमाणे वारीच्या 2 दिवस आधी सर्वांना लघुसंदेश पाठवून व प्रत्यक्ष फोन करून स्वच्छतेसाठी केलेल्या आवाहनामुळे खूपच उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे वनवासी कल्याण आश्रमातर्फे अध्यक्ष भरत केळकर यांनी आवर्जून नमूद केले.

घरकुल च्या विद्यार्थिनींचा संदेश

नाशिक ते त्रंबकेश्वर मार्गावार पिंपळगाव बहुला या ठिकाणी असलेल्या घरकुल या संस्थेच्या विद्यार्थिनीनी देखील यावेळी निर्मलवारीत आपला सक्रीय सहभाग नोंदविला. मानसिक अपंग असलेल्या विशेष विद्यार्थिनीसाठी घरकुल संस्थेच्या मध्य्मातून कार्य केले जाते. या विद्यार्ठीनिनी हाती फलक घेत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून मार्गस्थ होणार्‍या वारकर्यांना स्वच्छता व शौचालय वापरासंबंधी प्रबोधन केले.या विद्यार्थिनीच्या प्रयत्नांना उपस्थितांनी विशेष दाद देत त्यांच्या कार्याचे कौतुक यावेळी केले. याकामी घरकुल संस्थेच्या विद्या फडके यांनी विशेष परिश्रम घेतले.

Deshdoot
www.deshdoot.com