साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय
स्थानिक बातम्या

साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय

Gokul Pawar

Gokul Pawar

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून

शिर्डी (प्रतिनिधी)- श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या तदर्थ समितीच्यावतीने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून श्रीसाईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून मंदिरातील दैनंदिन पूजा-अर्चा नेहमीप्रमाणे सुरू राहतील, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

श्री. डोंगरे म्हणाले, जगभरातील काही देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आलेले असून सदर व्हायरसची लागण झालेले काही रुग्ण भारतातही आढळून आलेले आहेत. श्रीक्षेत्र शिर्डी हे देशातील नंबर दोनचे देवस्थान असून श्रीसाईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरिता देशाच्या व जगाच्या कानाकोपर्‍यातून भक्त शिर्डी येथे येत असतात. त्यामुळे मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठी वर्दळ होत असते.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. यामध्ये धार्मिक स्थळे, सामाजिक ठिकाणी गर्दी होऊ नये अथवा करू नये असे निर्देश देण्यात आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर श्रीसाईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीच्यावतीने दिनांक 17 मार्च 2020 रोजी दुपारी 3.00 वाजेपासून श्रीसाईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरिता साईभक्तांना बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आला असून समाधी मंदिरातील दैनंदिन पूजा-आर्चा सुरू राहतील यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही.

दर गुरुवारी निघणारी श्रींची नित्याची पालखी नियमित सुरू राहणार असून पालखीकरिता पुजारी व आवश्यक कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच या कालावधीत संस्थानचे श्रीसाईप्रसादालय व भक्तनिवासस्थानेही बंद ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाईनद्वारे दर्शन बुकींग केलेल्या साईभक्तांना दिनांक 17 मार्च 2020 दुपारी 03.00 वाजेपर्यंत दर्शनासाठी परवानगी दिली जाणार असून संकेतस्थळावरून ऑनलाईन दर्शन बुकींग बंद करण्यात आलेले आहे.

याबाबतची माहिती साईभक्तांना ई-मेल, दूरध्वनी व संकेतस्थळावरून देण्यात येत आहे. सदर कालावधीत गावकरी गेटही बंद ठेवण्यात येणार असून हे सर्व नियम शासनाच्या पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत. तरी साईभक्तांनी यांची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन श्री. डोंगरे यांनी केले.

तब्बल 80 वर्षांनंतर संस्थानच्या इतिहासात दुसर्‍यांदा मंदिर बंद
1941 साली देशात कॉलरा या आजाराची साथ पसरली होती त्यावेळी इंग्रजांनी संपूर्ण मंदिर बंद करून भाविकांना दर्शन बंद केले होते. त्या गोष्टीला आज 80 वर्षे होऊन गेले. त्यानंतर पुन्हा कोरोनाच्या संसर्गामुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर इतिहासात दुसर्‍यांदा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com