येवला : अंदरसुल येथील विहिरीत पडलेल्या काळवीटाची सुखरूप सुटका

येवला : अंदरसुल येथील विहिरीत पडलेल्या काळवीटाची सुखरूप सुटका

पाटोदा : येवला तालुक्यातील अंदरसुल येथे विहिरीत पडलेल्या काळवीटाची सुखरूप सुटका करण्यात यश आले.

दरम्यान अंदरसुल येथील दिनेश पांगीरे यांच्या शेतातील विहिरीत दुपारच्या सुमारास पाण्याच्या शोधात असलेले काळवीट पडले. पांगीरे यांनी तात्काळ येवला तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांना फोन वरून त्या संदर्भातील माहिती दिली.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह कर्मचारी दाखल होत काळविटाचा जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनाने लगेच गतिमान बचावकार्यास सुरवात केली. संजय भंडारी यांनी त्या अनुषंगाने येवला वन क्षेत्रांमधील वन कर्मचाऱ्यांना सूचना देऊन त्वरित सदर घटनास्थळी जाऊन काळविटास विहिरीतून काढून त्याचे प्राण वाचविणे बाबत सांगितले. पथकातील काही वनरक्षकांना विहिरीत उतरवण्यात आले. मादी काळवीटास सुखरूपपणे बाहेर काढून त्याला पुन्हा अधिवासात मुक्त करण्यात आलेले आहे.

येवला तालुक्यातील अंदरसुल येथून जवळच हाकेच्या अंतरावर ती राजापूर ममदापुर क्षेत्र हरणांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. सध्या सर्वत्र पाण्याचा तुटवडा भासत असल्यामुळे जंगलांमधील हरणं पाण्याच्या शोधात बाहेर पडत आहेत वनविभागाने पुरेशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तरीही नैसर्गिक पाण्याच्या शोधात हे हरन जंगलाच्या बाहेर पडतात आणि कधी विहिरीत पडतात, कधी कृत्रिम तळ्यांमध्ये पडतात.

तर कधी कुत्र्यांच्या भक्षस्थानी सापडतात. बऱ्याच वेळेस रस्ता ओलांडत असताना वाहनाचा धक्का लागून मरणही पावतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नियमित सतर्क राहून प्राणिमात्रांच्या प्राण रक्षणासाठी सहकार्य करून वेळोवेळी वन विभागास माहिती देत राहावी, असे मत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com