आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रियेला सुरुवात; ‘या’ कागदपत्रांची गरज
स्थानिक बातम्या

आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रियेला सुरुवात; ‘या’ कागदपत्रांची गरज

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । आर्थिक दुर्बल, मागासवर्गीय तसेच दिव्यांग घटकातील बालकांना नामांकित खाजगी शाळांमध्ये 25 टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार बालकांच्या मोफत शिक्षण हक्काची अमंलबजावणी याअंतर्गत करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात दि.6 फेब्रुवारीपर्यंत शाळांची नोंदणी केली जाणार आहे. तर 11 फेब्रुवारीपासून पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागणार आहेत.

शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन अर्थात आरटीई) मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना 25 टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले आहे.

दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा यामागील हेतू आहे. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्व प्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील मोफत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून प्रारंभिक टप्प्यात दि. 6 फेब्रुवारी पर्यंत शाळांची नोंदणी करण्यात येणार आहे. तर दि. 11 ते 29 फेब्रुवारी दरम्यान शालेय शिक्षण विभागाच्या संकेत स्थळावरून पालकांना ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत.

सन 2019-20 या वर्षी नोंदणी झालेल्या आरटीई 25 टक्के पात्र शाळांचे ऑटो रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. मात्र या सर्व शाळांची पडताळणी ही गटशिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरून करण्यात यावी तसेच स्थलांतरीत शाळा, नव्याने अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेल्या शाळा, अल्पसंख्याक शाळा विचारात घेऊन आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

दि. 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत आरटीई अंतर्गत शाळांना नोंदणी करावी लागणार असून त्यानंतर दि. 11 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान पालकांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. प्रवेशासाठीपहिली लॉटरी सोडत 11 ते 12 मार्च या दरम्यान काढण्यात येणार आहे. लॉटरीद्वारे प्रवेश मिळालेल्या पालकांना दि. 16 मार्च ते दि.3 एप्रिल या कालावधीत गटशिक्षणाधिकार्‍यांकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे, शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे –
निवासाचा पुरावा, जन्मतारखेचा दाखला, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र

प्रवेशासाठी एकच सोडत
गेल्यावर्षी आरटीई साठी सप्टेंबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे शिक्षण विभाग टीकेचा धनी ठरला होता. या पार्श्वभूमीवर यंदा प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठीप्रवेशासाठी एकच सोडत काढण्यात येणार आहे. .तर चार प्रतीक्षा याद्या जाहीर केल्या जातील. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रवेश मिळणार कि नाही यासाठी पालकांमध्ये चिंता राहणार नाही. आरटीई प्रवेशपात्र शाळांची क्षमता पूर्ण होईपर्यंत दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मेसेज पाठवण्यात येणार आहेत. शाळेच्या प्रवेश क्षमतेएवढीच संख्या यासाठीच्यासोडतीत असणार आहे

Deshdoot
www.deshdoot.com