देवळा : सावकी येथील शेतकऱ्याने मुळा पिकावर फिरवला रोटाव्हेटर
स्थानिक बातम्या

देवळा : सावकी येथील शेतकऱ्याने मुळा पिकावर फिरवला रोटाव्हेटर

Gokul Pawar

Gokul Pawar

खामखेडा : मुळ्याचे भाव घसरल्याने सावकी ता.देवळा येथील शेतकरी धनंजय बोरसे यांनी त्यांच्या शेतातील एक एकरांतील मुळा या भाजी पिकावर रोटाव्हेटर फिरवून पीक मोडीत काढले.

बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणात वाढल्याने भाजीपाल्याला कवडीमोलाचा भाव मिळत आहे. काबाडकष्ट करूनही शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने केलेला खर्चही निघणेही अवघड झाले आहे. तर काही वेळेस भाजी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असल्याने सावकी येथील संतप्त शेतकरी धनंजय बोरसे यांनी अखेर मुळ्याच्या शेतात रोटाव्हेटर फिरवत पीक नष्ट केले.

गेल्या दोन-तीन महिन्यात कांद्याचे भाव वाढल्याने हाॅटेल किंवा घरगुती स्वयंपाक घरातून कांदा गायब झाला होता यालाच पर्यायी म्हणून हॉटेल व घरघुती जेवणात कांद्या ऐवजी मुळ्याचा वापर वाढला होता त्यामुळे मुळ्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. बहुतांश शेतकऱ्यांनी मुळ्याला भाव मिळेल या आशेने मुळा पिकाची लागवड केली होती.परंतु कांद्याचे भाव स्वस्त झाल्याने मुळ्याची मागणी घटली. मुळ्याला ४ ते ५ रुपये प्रति किलो भाव मिळत असल्यामुळे मुळ्याच्या लागवडीसाठी झालेला खर्चही निघणे मुश्‍किल झाले असल्याने किमान शेतात खत होईल, या उद्देशाने धनंजय बोरसे यांनी या पिकावर रोटाव्हेटर फिरवत पीक नष्ट केले.

महागडे बि-बियाणे,औषधे ,मजुरी आदी सर्व खर्च करून पिकविलेल्या कोबी,फ्लावर,टमाटे आदीसह भाजीपाल्याला बाजारात सध्या कवडीमोल भाव मिळत आहे.सध्या कोणताही भाजीपाला बाजारात विक्रीस नेला तर केलेला उत्पादन खर्चाएवढेही पैसे हातात पडत नसल्याने शेतकऱ्यांना वाहतुकदाराचे व नाश्त्यासाठी खिशातून पैसे भरण्याची वेळ येत आहे.अशा परिस्थतीत माल विकूनही चार पैसे मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यात कांद्याचे भाव वाढल्याने हॉटेल व घरगुती जेवणात मुळ्याची मागणी वाढली होती त्यामुळे मुळ्याला भाव मिळेल या अपेक्षेने एक एकरांत मुळ्याची लागवड केली होती परंतु कांद्याचे भाव स्वस्त झाल्याने मुळ्याची मागणी घटली आता ४ ते ५ रू किलो भाव मिळत असल्यामुळे खर्च निघणेही अवघड असल्याने रोटाव्हेटर फिरवत मुळा पीक मोडीत काढले.
-धनंजय बोरसे, शेतकरी सावकी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com