ब्रह्मगिरीसह चार ठिकाणी रोप वेची चाचपणी

ब्रह्मगिरीसह चार ठिकाणी रोप वेची चाचपणी

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी डोंगराच्या पायथ्यापासून ते गंगाद्वारपर्यंत, मांगीतुंगी डोंगर, हतगड किल्ला, सप्तशृंगी गड ते मार्कंडेय डोंगर या ठिकाणी रोप वेनिर्मिती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला बहर येऊन त्याद्वारे अर्थकारणदेखील साधता येणार आहे.

वणी येथील अर्ध शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर फ्युनिक्युलर ट्रॉलीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी येणारे भाविक व पर्यटकांत वाढ झाली आहे. पर्यटकांचा ओघ वाढल्याने अर्थकारणाला चालना मिळाली आहे. त्याच धर्तीवर वणी येथील सप्तशृंगी गडावर रोप-वेची निर्मिती होणार आहे. नांदुरी ते सप्तशृंगी गड असा रोप-वे उभारला जाणार आहे.

जिल्ह्यातील इतर चार ठिकाणीही पर्यटनाला चालना देण्यासाठी रोप-वेची निर्मिती करण्यासाठी प्रशासकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली फिजिबिलिटी तपासली जात आहे. त्या फिजिबिलिटीचा रिपोर्ट प्रशासनास कंत्राटदाराने सादर केला परंतु त्यात आर्थिक बाबींसह सर्वच बाबींची स्पष्टता करण्यासह फेरअहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. तो प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.

जिल्ह्यातील धार्मिक स्थळे पर्यटनस्थळांमध्ये रूपांतर करण्याचा त्यामागे उद्देश आहे. त्यास जिल्हा नियोजन समितीतून निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत त्यावर चर्चा होऊन प्रत्यक्ष पुढील कामास गती दिली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com