Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकइगतपुरी : कुऱ्हेगाव येथे शेतकऱ्यांसाठी २१ बचत गटांनी उभारली ‘राईस मिल’

इगतपुरी : कुऱ्हेगाव येथे शेतकऱ्यांसाठी २१ बचत गटांनी उभारली ‘राईस मिल’

बेलगाव कुऱ्हे : शासनाच्या कृषी विभागाच्या मदतीने बचत गटासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना इगतपुरी तालुक्यात लाभदायक ठरल्या आहेत. कुऱ्हेगाव येथील सप्तशृंगी कृषी बचत गटाने २१ गटांना एकत्र करीत शेतकरी हितासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम विकास प्रकल्प व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने भाताच्या उत्पादित मालावर प्रर्किया करणाऱ्या दारणामाई शेतकरी उत्पादक कंपनीची प्रथमच निर्मिती केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्मााण झाले आहे.

ग्रामीण भागातील तरूण शेतकरी अन इतर पुरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वतःचा वैचारीक, आर्थिक उन्नतीचा मार्ग स्वतः तयार करीत शेतकरी ते थेट ग्राहकाला शेतमाल पुरविण्यासाठी राईस मिल कंपनीची स्थापना केल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा वेळ व पैशाची देखील बचत होणार आहे. या अगोदर घोटी येथे भाताच्या गिरणीत शेतकऱ्यांना जावे लागत होते.

- Advertisement -

कुऱ्हेगाव, मुंढेगाव, माणिकखांब, बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य, नांदगाव, कावनई येथील 100 रुपये शेअर्स प्रमाणे साडे सहाशे शेतकरी सभासद तयार होऊन साडे सहा लाख रुपयांची आर्थिक रक्कम शिल्लक होती तर साडे बारा लाख रुपये शासनाने देत त्यात राईस मिल घेऊन पॅकिंग करून तांदळाची विक्री नाशिक येथे केली जाते. कृषी प्रदर्शनामध्ये देखील तयार मालाचा स्टोल लावला जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. यातून शेतकरी कंपनी समृद्धीकडे वाटचाल करताना दिसत आहे.

उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, आत्माचे प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, कांबळे , सदाफळ, इगतपुरीचे तालुका कृषिअधिकारी शितलकुमार तंवर आदींचे मार्गदर्शन लाभले. माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे यांनी बचत गटाला उत्पादित कंपनीसाठी आर्थिक सहाय्य केले आहे. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत भाताच्या मिलसाठी धान्य साठविण्यासाठी गोदाम उपलबध करून दयावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हा बचत गट शेतकी विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम विकास प्रकल्प व आत्माशी संलग्न असल्याने शासनाच्या कृषी विभागाच्या योजनाही प्रभावीपणे राबविण्याचा सर्वांचा मानस आहे. दारणामाई शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन भाऊसाहेब धोंगडे, सचिव हरिभाऊ गतिर, संचालक जगन धोंगडे, विश्वास धोंगडे, बाबुराव धोंगडे, छाया गतीर, ज्ञानेश्वर भटाटे, नामदेव धोंगडे आदी भागीदार मेहनत घेत असतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या