त्र्यंबकेश्वर : ग्रामसेवकांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही : खासदार हेमंत गोडसे

त्र्यंबकेश्वर : ग्रामसेवकांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही : खासदार हेमंत गोडसे

वेळुंजे | वि.प्र : कोणत्याही परिस्थितीत ग्रामसेवकांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा घणाघात त्र्यंबक तालुक्यातील पाणी टंचाईच्या आढावा बैठकीत खासदार हेमंत गोडसे यांनी केला.

तालुक्यातील अनेक गावांना सध्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी तालुका पाणी टंचाईचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.

दरम्यान यंदा तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे उंच टेकडी चढून पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे. तर अनेकांना पाणी विकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अशा अनेक तक्रारींचा पाढा यावेळी प्रतिनिधींनी वाचला.

तर अनेक गावांनी ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिति गटविकास अधिकारी यांना वारंवार प्रस्ताव तसेच लेखी तक्रार करून देखील याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत असुन त्यामुळे सदर पाणी प्रश्न सुटत नसल्याची तक्रार अनेक गावांनी केली आहे.

सध्या लॉकडाऊन असल्याने मजुरीसाठी स्थलांतरित होणारे मजूर घरी आहेत. यामुळे दरवर्षी पेक्षा यंदा पाणी टंचाई अधिक भासत आहे. त्यामुळे अनेक वाड्या वस्त्यांवर पाण्यासाठी रात्रभर जागून दोन ते पाच किमी अंतरावरून पाणी आणुन आपली तहान भागवत आहे. अशी पाणी टंचाईची भीषण परिस्थिती खासदार यांच्यासमोर मांडण्यात आली. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावर लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

तसेच अनेक गावांतील ग्रामसेवक वेळेवर हजर न होता दहा ते पंधरा दिवसांनी गावात येत आहेत. तसेच कामचुकारपणा करत असल्याने खासदार हेमंत गोडसे यांनी हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत ग्रामसेवकांना सुनावले आहे.
यावेळी जलपरिषद च्या जल संरक्षकांनी यावेळी विविध गावातील नियोजना संदर्भात निवेदन दिले. तसेच अनेक गावांतील पाणी प्रस्ताव यावेळी खासदारांना देण्यात आले.

तालुक्यातील पाणी प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून गटविकास अधिकारी यांनी संबंधित ग्रामसेवक यांना सूचना करून त्या त्या गावांतील पाणी प्रश्न मार्गी लावावा. तसेच अनेकदा दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अशा गरजू गावांना शुध्द पाणी पुरवठा करण्यात यावा, यानंतर तक्रारी येता काम नये तसेच कुणीही या काळात पाण्यावाचून वंचित राहता कामा नये तसेच कामात कामचुकार करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल.
– खासदार हेमंत गोडसे

तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायत, अधिकारी यांनी निष्काळजीपणा न करता व नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता पाण्याची समस्या सोडवावी.
– समाधान बोडके, शिवसेना तालुका समन्वयक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com