एमपीएससीकडून 806 जागांसाठी भरती; अशी आहे अर्जप्रक्रिया
स्थानिक बातम्या

एमपीएससीकडून 806 जागांसाठी भरती; अशी आहे अर्जप्रक्रिया

Gokul Pawar

नाशिक । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी या वर्ग ‘ब’च्या 806 जगांची भरती केली जाणार आहे. यामध्ये उपनिरीक्षक पदाच्या सर्वाधिक 650 पदांचा समावेश आहे.

दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या एमपीएससीच्या जाहिरातीवरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. जाहिरातीत एनटी प्रवर्गासाठी जागाच उपलब्ध करून दिलेल्या नाहीत, असा आक्षेप विद्याथ्यानी घेतला आहे.

शासकीय पदांची भरती महापरीक्षा पोर्टलमधून केली जात होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने महापरीक्षा पोर्टल नुकतेच बंद करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी ही भरती एमपीएससी’कडूनच व्हावी, अशी मागणी केली असली तरी अद्याप सरकारने याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यातच आता गृहविभाग, वित्त विभाग आणि सामान्य प्रशासन विभागातील रिक्त पदांची भरती काढून विद्यार्थ्यांना खुश करण्याचा प्रयत्न झाला आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अजारपत्रित गट ‘ब’ साठी संयुक्त पूर्व परीक्षा 3 मे रोजी राज्यातील 37 परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. यामध्ये पोलिस उपनिरीक्षकाची 650 पदे आहेत. त्यापैकी महिलांसाठी 195, खेळाडूंसाठी 32 आणि अनाथांसाठी 6 पदे आरक्षीत आहेत. राज्य कर निरीक्षक पदाच्या 89 जागा भरती केल्या जाणार आहेत. त्यात 27 महिला, खेळाडूंसाठी 4 जागा आहेत. सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठीच्या 67 जागांपैकी 20 महिलांसाठी तर 3 खेळाडूंसाठी आरक्षित आहेत.

प्रवर्ग वगळल्याने विद्यार्थी संतप्त
सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पोस्टच्या जाहिरातीत एनटीसी आणि एनटीडीच्या जागा आरक्षणाप्रमाणे निघालेल्या नाहीत. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एनटी सी 24 आणि एनटीडीच्या 13 जागा निघणे अपेक्षित होते, मात्र, एनटीसीला केवळ 2 जागा आणि एनटीडीला एकही जागा निघालेली नाही. जोपर्यत पूर्वीप्रमाणे आरक्षणासह जागा निघत नाही तोपर्यंत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला स्थगिती द्यावी आणि नवीन जाहिरात शासनाने प्रसिद्ध करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

अर्जासाठी वेबसाईट : www.mahampsc.gov.in
अर्ज करण्याची मुदत – 28 फेब्रुवारी ते 19 मार्च 2020
परीक्षेची तारीख – 3 मे 2020

Deshdoot
www.deshdoot.com