गाव तेथे मानसोपचार : साडेचार हजार शिक्षकांना मनोसपचाराचे प्रशिक्षण
स्थानिक बातम्या

गाव तेथे मानसोपचार : साडेचार हजार शिक्षकांना मनोसपचाराचे प्रशिक्षण

Gokul Pawar

नाशिक । प्रतिनिधी
मानसिक आजाराच्या रुग्णांच्या अडचणींवर मात करून तळागाळापर्यंत मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी नाशिकच्या मानसोपचार तज्ञांनी सुरू केलेल्या गाव तेथे मानसोपचार या चळवळीत अंतर्गत वर्षभरात ग्रामिण भागातील 4 हजार 500 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नाशिक, मानसोपचार विभाग डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक व नाशिक सायकॅट्रिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने, 29 जानेवारी रोजी मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेमध्ये कार्यरत 800 शिक्षकांसाठी लहान मुलांना समजून घेताना या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी मुलांना समजून घेताना आपण मुलांचे मित्र झालं पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या भाषेत संवाद साधला पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉक्टर प्रशांत देवरे यांनी विशेष प्रयत्न केले तसेच प्रास्ताविक करताना त्यांनी शिक्षकांना लहान मुलांना समजून घेताना त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल पटवून दिले.

२०० मानसोपचार तज्ञ करणार प्रबोधन
चळवळीच्या पहिल्या टप्प्यात एप्रिल 2019 मध्ये शंभराच्या आसपास मानसोपचार तज्ञ यांनी खेड्यापाड्यांमध्ये जाऊन नैराश्य या विषयावर लोकांशी संवाद साधला. तसेच ऑक्टोबर 2019मध्ये तळागाळापर्यंत स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल 150 मानसोपचार तज्ज्ञांनी लोकांना मार्गदर्शन केले. मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनाही मानसिक समस्या भेडसावतात. 10 ते 15 टक्के लहान मुलांमध्ये विविध प्रकारचे मानसिक आजार असतात, तसेच दिव्यांग मुलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. म्हणूनच या चळवळीच्या तिसर्‍या टप्प्यात जानेवारी 2020 मध्ये सर्व 200 पेक्षा अधिक मानसोपचारतज्ज्ञांनी शिक्षकांचे प्रबोधन करण्याचे निश्चित केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com