सामाजिक भान : सार्वजनिक आरोग्य जपा; धूम्रपान टाळा
स्थानिक बातम्या

सामाजिक भान : सार्वजनिक आरोग्य जपा; धूम्रपान टाळा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकशास्त्राचे नियम पाळणे गरजेचे असते. मात्र, व्यसनाच्या शौकामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. गुटखा सेवन सार्वजनिक ठिकाणी सर्रास पिचकार्‍या मारुन भिंती लाल केल्या जातात. रेल्वे स्थानक, बसस्थानक, शासकीय व निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना या ठिकाणी धूम्रपान करून थुंकणे, पिचकार्‍या मारणे हे प्रकार सर्रास पहायला मिळतात. अगदी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील सिगारेट, गुटख्याचे सेवन करतात. त्यांच्याकडून देखील अस्वच्छता केली जाते. याबाबत नागरिकांशी संवाद साधला असता सामाजिक ठिकाणी वावरताना धूम्रपान करणे टाळले पाहिजे, असा सूर उमटला.

‘देशदूत’चा सिव्हिक सेन्स हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. सामाजिक ठिकाणी वावरताना जबाबदार नागरिक म्हणून सामाजिक नियमांचे पालन केले पाहिजे. धूम्रपानामुळे सार्वजनिक आयुष्य धोक्यात येते. धूम्रपान करणे टाळले पाहिजे. जेणे करून स्वत:सह समाजाचे आरोग्य निरोगी राहील.
– आरती बोराडे, शिक्षिका

धूम्रपान हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे. व्यसन करणार्‍यांकडून अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ पसरवली जाते. त्यामुळे संसर्गजन्य रोगाचा फैलाव होऊ शकतो. इतरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. स्वत:साठी व समाजाच्या आरोग्यासाठी धूम्रपान करणे टाळले पाहिजे.
– डॉ.नहूष सानप, दंत चिकित्सक

गुटाखा विक्रीला बंदी आहे. तरीदेखील चोरट्या मार्गाने गुटखा विक्री होतो. पुड्या खाऊन सार्वजनिक ठिकाणच्या भिंती पिचकार्‍यांनी रंगवल्या जातात. त्यामुळे परिसर अस्वच्छ होऊन संसर्गजन्य रोगांचा फैलाव होऊ शकतो. समाजाचे आरोग्य धोक्यात येईल, असे कृत्य व शौक करणे टाळले पाहिजे.
– गोकुळ सानप, प्राध्यापक

शाळेत लहानपणी नागरिकशास्त्राचे धडे प्रत्येकाने गिरवले आहेत. त्यात समाजात वावरताना कसे वागावे याचे नियम सांगण्यात आले आहे. मात्र, मोठे झाल्यावर या नियमांना आपण हरताळ फासत आहोत. धूम्रपान करून नागरिकशास्त्राच्या नियमांना आपण हरताळ फासत आहोत.
– संकेत भाबड, व्यवसायिक

गावांमध्येदेखील तरुणाईत व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. व्यसन करताना त्याचा त्रास इतरांना होतो. सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकणे, सिगारेट पिऊन धूर उडवणे, हे सर्रास पहायला मिळते. त्यामुळे गावाचे सौंदर्य खराब होतेे. आपण जे करत आहोत त्याचे अनुकरण भावी पिढी करते याचे तरी भान बाळगावे.
– प्रशांत काकड, शेतकरी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com