Friday, April 26, 2024
Homeनाशिकशिवजयंती मिरवणुकीनिमित्त वाहतुक मार्गात बदल; असा असेल मार्ग

शिवजयंती मिरवणुकीनिमित्त वाहतुक मार्गात बदल; असा असेल मार्ग

नाशिक । छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त निघणार्‍या मिरवणूकीसाठी शहरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. प्रामुख्याने मिरवणूक मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना बुधवारी (दि. 19) दुपारी 12 वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.

मिरवणुकीची सुरूवात वाकडी बारव (चौक मंडई) येथून होईल. तर मिरवणूक मार्गे रामकुंडावर सामारोप होणार आहे. मिरवणुकीच्या दिवशी या मार्गावर मोटारसायकल, चारचाकी या वाहनांसह सर्व वाहनांना बंदी असणार आहे. यात मिरवणुकीतील वाहन, पोलिस वाहने, अग्निशमन व अ‍ॅम्ब्युलन्स आदि वाहनांना परवानगी असणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे मिरवणुकीच्या दिवशी या मार्गावरील वाहनांना पर्यायी मार्गाने जावे लागणार आहे. तसेच, निमाणी बस स्थानक आणि रविवार कारंजावरून सुटणार्‍या सर्व बसेस व इतर वाहने आडगावनाका, कन्नमवार पूल, द्वारका सर्कल मार्गे वळवण्यात आल्या आहेत. याबरोबर पंचवटी एसटी डेपो क्रमांक 2 मधील निमाणी बस स्टॉप तसेच पंचवटी कारंजा येथुन सुटणार्‍या शहर वाहतूकीच्या सर्व बसेस पंचवटी डेपोतुन सुटतील.

तसेच ओझर, दिंडोरी, पेठ या भागातून येणार्‍या सर्व बसेस व इतर प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पुल व पुढे द्वारकासर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहर व इतर ठिकाणी जातील. वरील मार्गातील बदल 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 12 वाजेपासून मिरवणुक संपेपर्यंत अंमलात राहतील. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलिस स्टेशन पातळीवर शांतता समितीच्या बैठका पार पडल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

असा असेल मार्ग
मिरवणुकीची सुरूवात वाकडी बारव (चौक मंडई) येथून होईल. त्यानंतर जहांगिर मस्जिद- दादासाहेब फाळके रोड – महात्माफुले मार्केट- भद्रकाली मार्केट- बादशाही कॉर्नर- गाडगे महाराज पुतळा- मेनरोड- धुमाळ पाँईट- महात्मा गांधीरोड-सांगली बँक सिग्नल- मेहेर सिग्नल-स्वामी विवेकानंदरोड (जुना आग्रारोड)- अशोक स्तंभ- नवीन तांबट अळी- रविवार कारंजा- होळकर पुल- मालेगाव स्टॅण्ड- पंचवटी कारंजा- मालवीय चौक- परशुराम पुरीया रोडने विसर्जन ठिकाणी अर्थात रामकुंडापर्यंत पोहचेल या ठिकाणी मिरवणुकीचा समारोप होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या