मालेगावात शासकीय आरोग्य सेवेला खाजगी आरोग्य सेवेचीही जोड देणार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
स्थानिक बातम्या

मालेगावात शासकीय आरोग्य सेवेला खाजगी आरोग्य सेवेचीही जोड देणार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Gokul Pawar

Gokul Pawar

मालेगाव :  संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहरातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी शासकीय आरोग्य सेवेला खाजगी आरोग्य सेवेची जोड देण्यासाठी आय.एम.ए. व निमा संस्थेच्या डॉक्टरांचे योगदान मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज सांगितले.

एस.पी.एच.महाविद्यालयातील प्रांगणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासह आरोग्य सेवेच्या फेरनियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ.पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, उपायुक्त (प्रशासन) नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजीत राजपूत, आय.एम.ए. संस्थेचे अध्यक्ष डॉ.मयुर शहा, डॉ.अविनाश पवार, डॉ.अभय निकम, डॉ.विनीत देवरे, तर निमा मालेगावचे डॉ.दिपक पाटील, व निमा ग्रामीणचे डॉ.सुधाकर पाटील व डॉ.जतीन कापडणीस यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, कोविड आणि नॉन कोविड रुग्णांची उपचार पध्दती आपण व्यवस्थितपणे सुरु ठेवल्यास चांगला रिझल्ट मिळेल. पश्चिम भागात आतापर्यंत विशेष अडचण नव्हती. परंतु आपण एकदरीत अनुभव लक्षात घेता आता सर्वांनी मिळून समन्वयाने या संकटाचा सामना करणे आवश्यक आहे. त्याची पुर्वतयारी आवश्यक आहे.

रुग्ण संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. आता सुध्दा नागरिकांनी सुरक्षीत अंतर ठेवण्याची गरज आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आतापर्यंत पुर्व व पश्चिम भागासाठी जे नियोजन करण्यात आले होते त्याचे फेरनियोजन करण्याची गरज आहे. त्याच नियोजनाचा आज आढावा घेण्यात आला असून स्थानिक प्रशासनाकडून चांगली तयारी करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना केअर सेंटरची संख्या वाढवावी लागेल, पुर्व भागातील शाळांमध्ये व खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरु करण्यात येणार आहे. तर पश्चिम भागात महात्मा गांधी विद्या मंदीराचा संपुर्ण परिसरामध्ये  फिवर क्लिनीक, स्वॅब घेण्याची सुविधा, कोविड केअर सेंटर, अशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी योवळी सांगितले.

या ठिकाणी आय.एम.ए. व निमा या संस्थेतील सर्व डॉक्टर्स सदस्यांनी विनामुल्य आरोग्य सेवा देण्यासह आरोग्य सुविधांचा एक सुक्ष्म आराखडा तयार केला आहे. यातून निर्माण होणाऱ्या सक्षम आरोग्य सेवेचे एक रोड मॉडेल तयार होणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी यावेळी सांगितले.

त्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहरातील हज हाऊसला भेट दिली. व माळदे शिवारातील घरकुलांमध्ये उभारण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची पहाणी करुन आढावा घेतला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com