डाळिंब, द्राक्ष बागा काढून धरली पोल्ट्री व्यवसायाची वाट; महिन्याकाठी ३५ हजार उत्पन्न
स्थानिक बातम्या

डाळिंब, द्राक्ष बागा काढून धरली पोल्ट्री व्यवसायाची वाट; महिन्याकाठी ३५ हजार उत्पन्न

Gokul Pawar

Gokul Pawar

पंचाळे : आस्मानी व सुलतानी संकटांना सामोरे जावे लागत असल्याने अपेक्षित यश पदरात न पडल्याने शेतातील डाळिंब व द्राक्ष बागा काढून टाकून त्याऐवजी कुक्कुटपालन व्यवसायाची वाट धरणाऱ्या पंचाळे येथील संतोष विठ्ठल पवार या तरुण शेतकऱ्याने यशस्वी उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार केले आहे.

पवार कुटुंबीय मूळचे निफाड तालुक्यातील नैताळे या गावचे. २००७ यावर्षी त्यांनी पंचाळे शिवारात चार एकर जमीन घेतली. प्रथमता त्यांनी वाईन द्राक्षाची लागवड केली, परंतु हमी भाव नसल्याने त्यांनी ती बाग काढून टाकली. त्यानंतर टेबल ग्रेप्सचे पिक घेऊन पहिला बहार घेतला. दुसऱ्या बहरात दुष्काळ पडला. पाण्याअभावी बाग जळून गेली. स्टेट बँके कडून दहा लाख रुपये कर्ज काढले. सांगवी ते पंचाळे यदरम्यान तीस हजार फूट अंतरावरून पाईपलाईन करून चार एकर डाळिंबाची लागवड केली.

त्यामध्ये दोन एकर उन्हाळ कांदे, दहा हजार रुपये वार्षिक खंडाने घेतलेल्या जमिनीत तीन एकर क्षेत्रावर खरबूज व दोन एकर टरबूज ही आंतरपिके घेतली. मात्र, गारपिटीने खरबूज , डाळिंब, टरबूज या पिकांचे पंधरा लाखाचे नुकसान झाले. डाळींबाचे २० किलोचे कॅरेट २०० रुपये या भावाने डाळिंब विक्री केली . त्यात दहा ते पंधरा लाख रुपये तोटा झाला. नंतर मात्र सातत्याने अस्मानी संकटामुळे होणाऱ्या या नुकसानीस कंटाळून शेवटी पवार यांनी पोल्ट्री व्यवसाय करण्याचा विचार केला.

पत्नी आशा, मुलगी अश्विनी, मुलगा विशाल यांचे कडून पोल्ट्री व्यवसायात मदत करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर संतोष पवार यांनी पोल्ट्री व्यवसायात सुरुवात केली. त्यासाठी नातेवाइकांकडून मुदत ठेवीवर उचल घेऊन बारा लाख रुपये उभे केले.

या गुंतवणूकीतून १८०० कोंबड्यांसाठी शेड उभारले. तेथे दीड हजार अंड्यांचे उत्पादन होत आहे. एका पक्ष्यासाठी दिवसाकाठी ११० ग्रॅम मक्याचे खाद्य द्यावे लागते. म्हणजे दररोज सरासरी दोन क्विंटल खाद्य लागते. मासिक ४५ हजार अंड्यांचे उत्पन्न होत असून त्यातुन पावणे दोन लाख रुपयांची उलाढाल होते. डॉक्टर, खाद्य, लाईट बिल, सोया, मजुरी यापोटी सव्वा लाख रुपये खर्च वजा करता महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपयाचे नगदी उत्पन्न होत असल्याने शेतीपेक्षा पोल्ट्री व्यवसाय परवडला असे पवार यांचे अनुभवाचे बोल आहेत.

आत्मनिर्भर होण्यासाठी शासकीय योजनांवर डोळा ठेवून प्रगती न करणारे शेतकरी अपयशाला खचून आत्महत्येसारखा मार्ग निवडतात. परंतु आपण दुबळे नसून इतरांपेक्षा वेगळे करून दाखवू ही भावना ठेवल्यास शेतकऱ्यांची नक्कीच प्रगती होईल.
– संतोष पवार, पोल्ट्री उद्योजक पंचाळे

Deshdoot
www.deshdoot.com