नांदगाव : ‘ति’च्यासाठी पोलिसांनी धावती रेल्वे थांबविली; जाणून घ्या कारण
स्थानिक बातम्या

नांदगाव : ‘ति’च्यासाठी पोलिसांनी धावती रेल्वे थांबविली; जाणून घ्या कारण

Gokul Pawar

नांदगाव । मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून उत्तरप्रदेशात जाणार्‍या महिलेला नांदगाव रेल्वेस्थानकावर प्रसूती वेदना होत असतांना रेल्वे व शहर पोलीस देवदूतासारखे धावून गेले. सदर महिलेस तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे दोन जीव वाचल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

शनिवारी पहाटे 3.30 वाजता नांदगाव रेल्वे स्थानकावर आलेल्या कुशीनगर एक्स्प्रेसने उत्तरप्रदेश (गोंडा) येथील आदित्यप्रसाद जैस्वाल हे पत्नी सुमितादेवीसोबत प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान जैस्वाल यांच्या पत्नीस प्रसुती वेदना असह्य होत असल्याने त्यांनी तिकीट तपासणी अधिकार्‍याला सांगितल्याने नांदगाव रेल्वेस्थानकावर गाडी थांबविण्यात आली. याचवेळी रेल्वेचे एएसआय शिवाजी इघे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मुलगा चेतन यास बोलवून घेतले.

त्यांनी 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. मनमाड येथे रुग्णवाहिकेसाठी फोन केल्यास कालापव्यय होणार होता. त्यामुळे इघे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत शहर पोलिसाशी संपर्क साधून गस्तीवरील पोलीस सेवक दिनेश सुळ व वाघ यांना परिस्थितीची माहिती दिल्याने ते वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्याच वाहनांतून महिलेस नांदगाव ग्रामीण रुग्णालयात नेवून दाखल करण्यात आले.

सदर महिलेची सुखरूप प्रसुती होऊन तिने कन्यारत्नास जन्म दिला. बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांनी सांगितले. या सहकार्याने भारावलेल्या माता-पित्याने पोलिसांचे आभार मानले.

Deshdoot
www.deshdoot.com