मद्यधुंद अवस्थेत सैनिकांची पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण; शालिमार येथील घटना
स्थानिक बातम्या

मद्यधुंद अवस्थेत सैनिकांची पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण; शालिमार येथील घटना

Gokul Pawar

नाशिक : लष्कराच्या दोघा सुभेदारांनी खडकाळी सिग्नल येथे पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसांनी अडविल्याच्या रागातून एका पोलीस सेवकाच्या कानशिलात लगावून दुसर्‍या पोलिसाचे कारमधून अपहरण केल्याचा खळबळजबक प्रकार मध्यरात्री पावणेदोन वाजता घडला. या प्रकरणी सेवेत असलेल्या सुभेदारासह एका निवृत्त सुभेदारावर भद्रकाली पोलीस ठाण्यात अपहरणासह सरकारी कामात अडथळा व ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित प्रल्हास दापुरकर (43, सेवानिवृत्त सुभेदार, रा. सत्यनगर, हिरावाडी, पंचवटी) व मन्ना डे(वय -43, सुभेदार, रा. स्कूल ऑफ आर्टीलरी, देवळाली कॅम्प मूळ रा. देवनगर, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. काल रात्री पावणेदोन वाजता भद्रकाली पोलीस ठाण्याचे बीट मार्शल दिपक सखाराम पाटील व शिपाई चव्हाण हे शालिमार परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्याचवेळी त्यांना जेएच 01 सीजी 2698 या क्रमांकाची बलेनो कार संशयास्पद उभी असल्याचे आढळले.

त्यानंतर पोलीस कर्मचारी गाडीजवळ गेले असता, त्यांना गाडीतील संशयित मद्याचे सेवन केल्याचे आढळून आले, याचवेळी रोहित दापुरकर या निवृत्त सुभेदाराने पोलीस कर्मचारी चव्हाण यांच्याशी वाद घालून त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर पोलीस शिपाई पाटील यांनी बलेनो कारमध्ये बसून सशयितांना गाडी पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितले. मात्र, या दोघांनी गाडी पोलीस ठाण्यात न नेता थेट देवळाली कॅम्प च्या दिशेने नेली. दरम्यान, मध्यरात्री नियंत्रण कक्ष व इतर मोबाईने संदेश मिळाल्यावर नाकाबंदी करून वडनेर गेट येथे बलेनो कार अडवून संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली.

दोघांनी मद्याचे सेवन केले होते. त्याचवेळी त्यांना पोलीस ठाण्यास बोलावल्यानंतर त्यांनी पोलीस सेवकाच्या कानशिलात लगावून एकाचे अपहरण केले.
-साजन सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे

Deshdoot
www.deshdoot.com